छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या मालिका या अनेकांच्या जिव्हाळ्याचा भाग झालेला आहे. त्यामुळे या मालिका पाहण्याकडे अनेकांचा ओघ असतो. खासकरुन महिलावर्गातून मालिकांना विशेष पसंती मिळते. त्यातच सध्या झी मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका आहे. अल्पावधीमध्ये या मालिकेने प्रेक्षकांची लोकप्रियता मिळविली असून तिची भूरळ खासदार स्मृती इराणी यांनाही पडली आहे. त्यामुळेच या मालिकेतील एका भागाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमधून सासू-सूनेच्या आदर्श जोडीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या मालिकेत तेजश्री प्रधानने सूनेची भूमिका साकारली असून अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सासूची भूमिका वठविली आहे. विशेष म्हणजे सासू-सूनेमधील गोड नात्यावर भाष्य करणाऱ्या या मालिकेतील एक भाग सध्या चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. या भागामध्ये आईने आपल्या घरासाठी केलेलं बलिदान, त्याग, काळजी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळेच स्मृती इराणी यांनी हा भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनेक वेळा आपण आईला रागात किंवा मस्करीमध्ये बोलून जातो की, ‘तू पूर्ण दिवस घरात बसून काय करतेस?’ मात्र सतत घरात राहणारी आई आपल्या मुलांसाठी, घरातल्यांसाठी किती काय-काय करते याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. घरात कोणी आजारी असेल तर तिच्या डोळ्याला डोळा लागत नाही. इतकंच नाही तर ती आजारी असताना सुद्धा केवळ आपल्या घरातल्यांसाठी स्वत:च दुखणं दूर सारते. तरीदेखील आपला कायम प्रश्न असतो की तू काय करतेस?, या घटनेवर आधारित एक भाग प्रसारित करण्यात आला. हा भाग पाहिल्यानंतर स्मृती इराणी यांना त्यांच्या लोकप्रिय ‘तुलसी’ या मालिकेची आठवण आली.
एकेकाळी ‘तुलसी’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेमध्ये स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका होती. त्यातच ‘अग्गंबाई सासूबाई’चा भाग पाहिल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यामुळेच त्यांनी हा भावूक आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतून अनोख्या आणि प्रेमळ नात्यांचे बंधन उत्तमरित्या उलगडण्यात आले आहेत. सासू-सूनेभोवती फिरणाऱ्या या मालिकेत आपल्या सासूला कायम समजून घेणारी, तिचं मन वाचणारी सून प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.