मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरच्या ‘दंगल’ने सध्या बॉलिवूड जगतावर कब्जा केल्याचे दिसत आहे. चलन कलहाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ने अवघ्या चार दिवसांत चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाने मंगळवारी संध्याकाळ पर्यंत १५५ कोटी रुपयांची कमाई करुन सुशांत सिंग राजपूत अभिनीत ‘एम. एस धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाला मागे टाकल्याचे वृत्त फायनाशियल एक्स्प्रेसने दिले आहे. सुट्टीच्या दिवसांनंतर सोमवारी आणि मंगळवारी या चित्रपटाने तब्बल २० कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगण्यात येते. मात्र सुचेता दलालने केलेल्या एका ट्विटमुळे या चित्रपटाच्या कमाईबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ख्रिसमसच्यादरम्यान प्रदर्शित झालेल्या आमिरच्या चित्रपटाबाबत असे कसे होऊ शकते? मागीलवेळी आमिरच्या ‘पीके’ चित्रपटाची अवस्थाही अशीच होती. अशा आशयाच्या ट्विट करुन सुचेताने ‘दंगल’ चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर या चित्रपटाची दोन तिकिटे उपलब्ध असल्याची माहिती मिळत असताना चित्रपटगृहातील परिस्थिती विराधाभास दाखवून देणारी असल्याने ‘दंगल’च्या कमाईच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. संकेतस्थळावर तिकिट उपलब्ध नसताना चित्रपटगृहातील १५ टक्के खुर्च्या रिकाम्या दिसतात. असा उल्लेखही या ट्विटमध्ये करण्यात आलेला आहे. बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या कमाईची आकडेवारीवर आरोप झाले आहेत. त्यामुळे या ट्विटमुळे आमिरचा ‘दंगल’ चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीवर  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ चित्रपटाने विक्रमी कमाई केल्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच २३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसात तब्बल १०६. ९५ कोटींची कमाई केली होती. दंगलने रविवारी ४२.३५ कोटी इतकी कमाई केली. शुक्रवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने देशात नोटाबंदीचे वातावरण असूनही तीन दिवसांत तब्बल १०६. ९५ कोटींची कमाई केली होती. ‘दंगल’ने पहिल्या दिवशी २९.७८ कोटी तर दुस-या दिवशी ३४.८२ कोटी तर तिस-या दिवशी तब्बल ४२.३५ कोटी इतकी कमाई केली होती. या कमाईत तमिळ आणि तेलगूमधील व्हर्जनच्या कमाईचा आकडादेखील आहे. शुक्रवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसतानाही चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली कमाई  उल्लेखनीय असल्याचे बोलले गेले.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दंगलच्या कमाईचा आकडा ट्विट करून ही माहिती दिली होती. भारताबाहेर २१ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत ४४.९८ कोटींची कमाई केली होती.