सोशल मीडियावर सध्या अनिल कपूर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अनिल कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिसत आहेत. या फोटोवरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतकंच नाही तर अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरलाही ट्रोल केले जात आहे. सोनम सोशल मीडियावर नेहमीच बेधडकपणे आपली मतं मांडते. त्यामुळे या फोटोवर तिचं काय मत आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

दिल्लीमधील शाहिनबाग येथे झालेल्या गोळीबाराचा निषेध करत सोनमने नुकतीच एक पोस्ट लिहिली होती. ‘तुम्ही स्वत:ला हिंदू मानत असाल तर कर्म आणि धर्म या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि अशा घटना या दोन्ही गोष्टींमध्ये बसत नाहीत’, असं तिने म्हटलं होतं. तिच्या याच ट्विटवर अनिल कपूर यांचा दाऊदसोबतचा फोटो शेअर करत एका युजरने सोनमला प्रतिप्रश्न केला. ‘तू नेहमीच बेधडकपणे तुझी मतं मांडतेस. दाऊदसोबत तुझ्या वडिलांचा फोटो हा त्यांच्या कर्माशी संबंधित आहे की धर्माशी हे कृपया तू देशाला सांगशील का’, असा सवाल त्या युजरने केला. यावर सोनमने उत्तर दिलं की, ‘या फोटोचा संबंध क्रिकेटशी आहे, भारताच्या क्रिकेटशी.’

अनिल कपूर हे राज कपूर आणि कृष्णा कपूर यांच्यासोबत १९९० मध्ये शारजाह येथे क्रिकेट मॅचसाठी गेले होते. कोणीतरी त्यांचा फोटो काढला आणि त्यांना माहितसुद्धा नव्हतं की त्यांच्यासोबत कोणकोणते व्यक्ती उभे आहेत. द्वेष पसरवण्यासाठी आणि दुसऱ्यांना दुखावण्यासाठी देव तुम्हाला माफ करो अशी मी प्रार्थना करेन, असं ती म्हणाली.