बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने इंग्रजी वृत्तपत्रांद्वारे छापण्यात आलेल्या तिच्या फोटोंवर आक्षेप घेतला आहे. चुकीच्या अँगलने घेतलेले फोटो छापून आणल्याचा राग तिने तिच्या ट्विटरवर व्यक्त केला. सोनमने तिच्या एका ट्विटर युझरने त्या वृत्तपत्राचे कात्रण कापून तिला त्या फोटोत टॅग केले होते. याबद्दल लिहिताना सोनम म्हणाली की, छायाचित्रकाराने चुकीच्या मार्गाचा वापर करुन हे फोटो घेतले.

नंतर तिने त्या वृत्तपत्रांना आपल्या ट्विटमध्ये टॅग करत म्हटले की, मी जे कपडे घातले होते त्यात मला अजिबात अवघडलेपण वाटत नव्हते. मी फार आत्मविश्वासाने वावरत होते. छायाचित्रकाराने चुकीचा फोटो घेतला. पण मला त्याचे काही वाटत नाही. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकरने तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत म्हटले की, धन्यवाद आणि मी अपेक्षा करते की ही बातमी कोणा महिलेने लिहिलेली नसावी. हे फोटो एका प्रमोशन कार्यक्रमावेळचे होते. सोनमचे स्टायलिंग तिची बहिण रिया कपूरने केले होते. दोघींनीही या कार्यक्रमात जंपसूटला प्राधान्य दिले होते. रशियन फॅशन हाऊस रजारियो एटेलियरने डिझाइन केलेल्या या कपड्यांमधला एक फोटो सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला आहे. याच कार्यक्रमातले काही फोटो इंडियन एक्सप्रेसनेही प्रसिद्ध केले आहेत.

दरम्यान, सोनम कपूरने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ चित्रपटातील अभिनयाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. सोनमच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचे तर, ‘वीरे दी वेडिंग, ‘पॅडमॅन’ आणि ‘दत्त’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाशिवाय सोनमची उपलब्धी सांगायचे तर स्वतःचे डिजिटल स्टिकर असणारी सोनम कपूर ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरल्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोनमने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांच्या रुपात हे डिजिटल स्टिकर बनवण्यात आले आहेत. असे हे बहुरंगी आणि बहुढंगी डिजिटल स्टिकर लवकरच प्रदर्शित केले जाणार असून सोनमच्याच सिग्नेचर अॅपवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सोनम ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिचे स्वतःचे अॅप लॉन्च झाले आहे.