अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली. मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा पाहून सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. पण या पोस्टमुळेच तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

‘मला शहरात पोहोचायला दोन तास लागले. अजूनही मी ट्रॅफिकमुळे पोहोचली नाही. रस्ते खराब आहेत आणि प्रदूषणसुद्धा वाढलं आहे. घरातून बाहेर पडणं म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखं आहे,’ अशी पोस्ट सोनमने लिहिली. काही वेळातच सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यावर अनंत वासू नावाच्या एका युजरने प्रतिक्रिया दिली. ‘तुमच्यासारखे लोक सार्वजनिक वाहनांचा किंवा कमी इंधन लागणाऱ्या गाड्यांचा वापर करत नाहीत. तुझ्या आलिशान गाड्या केवळ तीन ते चार किमी प्रतिलीटर मायलेज देतात हे तुला माहित आहे का? तुझ्या घरातील १०-१२ एसीसुद्धा जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वांत आधी तू तुझ्यापासून होणारं प्रदूषण कमी कर,’ असा सल्ला त्या युजरने दिला.

अनंत वासूच्या या उत्तरामुळे सोनम चांगलीच भडकली. ‘तुझ्यासारख्या पुरुषांमुळे महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात. कारण त्यांना छेडछाडीची भीती असते,’ असं प्रत्युत्तर सोनमने दिलं. सोशल मीडियावर सोनम आणि त्या युजरमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ‘तुझ्या या वक्तव्याविरोधात मी तुला कोर्टातही खेचू शकतो. कारण मला देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझ्यासारखा पदवीविना न्यायाधीश नाही,’ अशा शब्दांत अनंत वासूने सोनमला सुनावलं. त्याच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांनी सोनमला ट्रोल केलं. छेडछाड आणि सार्वजनिक वाहन वापरण्याचा काय संबंध असा सवाल नेटकऱ्यांनी सोनमला विचारला. तर अनेकांनी विनाकारण पुरुषांवर आरोप करत असल्याची टीका केली.

वाचा : तनुश्री- नाना वादावर रणवीर- दीपिका म्हणतात..

याआधीही सोनम कपूर अनेकदा ट्रोल झाली आहे. काळवीट शिकारप्रकरणी तिने सलमान खानची पाठराखण करत ट्विट केलं होतं. त्यावेळीही नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं.