गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ज्या लग्नाची जोरदार चर्चा होती, अखेर त्याची निश्चित तारीख जाहीर झाली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहुजा येत्या ८ मे रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबईत हा लग्नसोहळा पार पडणार असून कपूर आणि अहुजा कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सोनम आणि आनंद एकमेकांना डेट करत असून अनेक कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. गेल्या काही दिवसांपासून सोनमच्या लग्नाविषयी बऱ्याच चर्चा ऐकायला मिळाल्या. अखेर हा मुहूर्त ठरला असून तिच्या लग्नाविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
Bollywood star #SonamKapoor to marry Anand Ahuja on May 8, says family @sonamakapoor
— Press Trust of India (@PTI_News) May 1, 2018
सोनम आणि आनंदचं लग्न वांद्रे येथील हेरिटेज हवेली इथं होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर मेहंदी, संगीत यांसारखे लग्नापूर्वीचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. सोनमच्या संगीत कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने कोरिओग्राफी केली असून अनिल कपूर आपल्या लाडक्या लेकीला या कार्यक्रमात विशेष सरप्राइज देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ चं शुटिंग पूर्ण झालं आहे. यानंतर ती लग्नाच्या तयारीला लागली आहे. याआधी सोनमचं लग्न राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता हा सोहळा मुंबईत होणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. जवळच्या मित्रमंडळींसाठी ‘फॅशनिस्टा’ सोनम आणि आनंद साखरपुड्याच्या छोटेखानी कार्यक्रमाचंही आयोजन करण्याच्या विचारात आहेत. तेव्हा आता तिच्या लग्नसोहळ्याची धूम येत्या काळात अनेकांचे डोळे दिपवणार असंच म्हणावं लागेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 7:10 pm