गेल्या कित्येक दिवसापासून अभिनेता सोनू सूद मजुरांच्या मदतीसाठी उभा ठाकला आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे,तरीदेखील एकही दिवस सुट्टी न घेता सोनू सूद आणि त्याची टीम सतत मदतकार्य करत आहे. आतापर्यंत सोनूने हजारोंच्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलं आहे. यामध्येच आता त्याने केरळमध्ये अडकलेल्या १७७ मुलींना त्यांच्या घरी सुखरुपरित्या पोहोचवलं आहे.

‘एएनआय’नुसार, या संकटकाळात सोनूने गरीबांसाठी, मजुरांसाठी जे मदतकार्य सुरु केलं आहे, ते पाहून अनेकांनी त्याला सुपरहिरो म्हटलं आहे. विशेष म्हणजे देशातील कानाकोप्यामधून अनेक जण सोनूकडे मदतीची आस लावून बसले आहेत. त्यामुळे सोनूदेखील त्याला शक्य होईल तसं प्रत्येक गरजुपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यात त्याने अलिकडेच १७७ मुलींना विमानाने त्यांच्या घरी पोहोचविल्याचं सांगण्यात येत आहे.

केरळमध्ये एका फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या जवळपास १७७ मुली लॉकडाउनमुळे अडकल्या होत्या. या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सोनूला दिली. त्यानंतर सोनूने या मुलींना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याने सरकारकडून भुवनेश्वर आणि कोच्ची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सोनूने बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं.

दरम्यान, सोनूने केलेल्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या सोनू दिवसरात्र काम करुन प्रत्येक मजुराला त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे मदत मागत असून सोनूदेखील त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.