करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यापासून गरीब विद्यार्थांच्या शिक्षणापर्यंत विविध प्रकारची मदत तो करत आहे. विशेष म्हणजे ही सर्व मदत तो मोफत करत आहे. मात्र काही मंडळी सोनू सूदचं नाव वापरुन लोकांना फसवत आहेत. खोटे मेसेज आणि वॉट्सअॅप नंबरद्वारे पैसे उकळत आहेत. अशा मंडळींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सोनूने दिला आहे.

अवश्य पाहा – “मुलांसाठी थाळ्या सजवतात अन् आम्हाला फेकलेले तुकडे देतात”

“कृपया कोणालाही पैसे देऊ नका. आमच्या सर्व सेवा फ्री आहेत. जी मंडळी गरीबांना फसवून पैसे मिळवतायत त्यांनी एकदा येऊन मला भेटावं. मी तुम्हाला मेहनत करायला शिकवेन. प्रामाणिकपणे आयुष्य जगायला शिकवेन.” अशा आशयाचं ट्विट सोनू सूदने केलं आहे. या ट्विटद्वारे त्याने फसवणूक करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य पाहा – “चाहत्याला हवंय भाजपामधून बिहार निवडणूकीचं तिकिट”; सोनू सूदने दिला भन्नाट रिप्लाय

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.