करोना विषाणूमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून देशात लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. या बंदच्या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, या काळात अभिनेता सोनू सूद सातत्याने गरजुंना मदत करत आहे. यामध्येच सोनू सूदने पुन्हा एका गरजुला अशीच मदत केली असून त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च केलं आहे.

गेल्या १२ वर्षापासून अमनजीत शारीरिक समस्यांमुळे त्रस्त होते. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं. विशेष म्हणजे अमनजीत यांच्या समस्येविषयी सोनू सूदला समजल्यानंतर त्याने तात्काळ मदत केली. याविषयी अमनजीत यांच्या डॉक्टरांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.


“अमनजीत यांची प्रकृती आता स्थिर आहे. तब्बल ११ तास त्यांच्यावर न्युरो सर्जरी करण्यात आली. सोनू सूद यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क केला आणि मदत केली. इतकंच नाही तर शस्त्रक्रियानंतरही त्यांनी चौकशी केली.त्यामुळे त्यांचे मनापासून आभार, असं ट्विट अमनजीतच्या डॉक्टरांनी केलं.

दरम्यान, सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे.