करोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविल्यानंतर सोनूने त्याचा मोर्चा विदेशात अडकलेल्या भारतीयांकडे वळविला आहे. काही दिवसापूर्वी सोनूने किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या जवळपास ६ हजार विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणलं होतं. त्यानंतर आता रशियात अडकलेल्या १०१ विद्यार्थ्यांनादेखील परत मायदेशात आणलं आहे, असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

करोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात सारं काही बंद असून आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या संकटकाळात विदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा देशात सुखरुप आणण्यासाठी सोनू मदत करत आहे.

रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या जवळपास १०१ विद्यार्थ्यांसाठी सोनूने विमानाची सोय केली होती. त्यामुळे हे विद्यार्थी बुधवारी सुखरूप परतले आहेत. यातील १०० विद्यार्थी चेन्नईमधील असून १ विद्यार्थी दिल्लीतील आहे. सध्या हे विद्यार्थी क्वारंटाइन झाले आहेत.

दरम्यान, गरजुंना मदत करण्यासोबतच आता सोनूने प्रवासी रोजगार.कॉम ही वेबसाईटदेखील सुरु केली आहे. या कंपनीत तो जवळपास ३ लाख मजुरांना नोकऱ्या देणार आहे.