संपूर्ण देशावर कोविड १९ चं संकट असताना लॉकडाउनमुळे विविध शहरांत अडकलेल्या गरीब स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्याचं काम अभिनेता सोनू सूदने केलं. मात्र काहींनी त्याच्या या कामावर प्रश्न उपस्थित केले. राजकीय फायद्यासाठी सोनू सूद हे काम करतोय असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला. या आरोपांना न जुमानता आपलं काम सुरू ठेवणार असल्याचं सोनू सूदने सांगितलंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या कामाबद्दल जे काही आरोप केले जातात ते मी कधी वाचतसुद्धा नाही. या आरोपांवर माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी जेव्हा एखादा व्यक्ती फोन करतो, तेव्हासुद्धा मी कामात व्यस्त असतो. त्या आरोपांपेक्षा मला माझं काम जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यांना मी जुमानत नाही. जेव्हा तुम्ही काही चांगलं काम करता तेव्हा तुमच्याकडे बोट दाखवणारे अनेक व्यक्ती असतात. उलट अशा आरोपांमुळे मला अजून जोमाने काम करण्याची ताकद मिळते, प्रेरणा मिळते. स्थलांतरित मजुरांना मी घरी पोहोचवण्याचं काम सुरूच ठेवेन.”

सोनू सूदने आतापर्यंत स्थलांतरितांना घरी पोहोचवण्यासाठी बस, ट्रेन, विमानाची सोय केली आहे. मदतीसाठी केलेल्या प्रत्येक मेसेजला तो स्वत:ला उत्तर देत आहे. त्याच्या या कामात त्याची संपूर्ण टीम पाठिशी आहे.