करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. पण या कठीण काळात सोनू सूद अनेकांच्या मदतीला धावून आला आहे. लॉकडाउनमध्ये अनेक प्रवासी मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यास सोनू सूदने मदत केली होती. त्यासाठी त्याने आणि त्याच्या संपूर्ण टीमने ट्विटरवर त्याचा फोन नंबर दिला होता. तसेच त्याने अनेक कामगारांना ट्विटरद्वारे मदत केली. आता देखील तो करोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या लोकांना मदत करत आहे. पण नुकताच एका मुलाने सोनू सूदकडे एक वेगळी मागणी केली आहे. त्यावर सोनू सूदने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत.

एका मुलाने ट्विट करत ‘सोनू सर कृपया मला खेळायला प्ले स्टेशन द्या. माझ्या आजूबाजूला राहणारी मुले लॉकडाउनमध्ये गेम खेळून आनंद घेत आहेत. सोनू सर कृपया माझी मदत करा’ असे म्हटले आहे. सोनू सूदने त्यावर रिप्लाय देखील दिला आहे.

‘जर तुझ्याकडे खेळायला प्ले स्टेशन नाही तर खरज खूप चांगली गोष्ट आहे. काही पुस्तके घे आणि ती वाच. मी तुला त्यासाठी मदत करु शकतो’ असे सोनू सूदने म्हटले आहे. सोनू सूदने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.

लॉकडाउनमध्ये सोनू सूदने प्रवासी मजदूर कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली. तो आणि त्याची संपूर्ण टीम कामगारांची मदत करत होते. तसेच काही दिवसांपूर्वी जॉर्जियामध्ये अडकलेल्या ५० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सोनू सूद मदत करत असल्याचे समोर आले आहे.