छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून आज द कपिल शर्मा शो याकडे पाहिलं जातं. उत्तम सूत्रसंचालन आणि विनोदबुद्धी यांच्या जोरावर कपिलने या शोचं नाव अनेकांच्या मनावर कोरलं आहे. त्याच्यासोबत या कार्यक्रमातील अन्य कलाकारही तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात या सगळ्यांची प्रेक्षकांसोबत भेट न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते व्याकूळ झाले आहेत. मात्र लवकरच हा शो पुन्हा सुरु होणार असून लॉकडाउननंतरच्या पहिल्याच भागात अभिनेता सोनू सूद हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार,आतापर्यंत ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. मात्र लॉकडाउननंतरच्या पहिल्याच शोमध्ये अभिनेता सोनू सूद येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे प्रेक्षक या नव्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, यो शोमध्ये सोनू सूदने गरजुंना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी कशी मदत केली. या कार्यात कोणते अडथळे आले यावर भाष्य करणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे देशातील नागरिकांना मदत केल्यानंतर सोनूने त्याचा मोर्चा विदेशात अडकलेल्या लोकांकडे वळविला आहे.