अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील अॅक्शन सीन पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र निर्मात्यांनी ही उत्सुकता आणखी ताणली आहे. कारण करोना व्हायरसमुळे ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.
‘सूर्यवंशी’चे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केलं आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली. “आम्ही या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनीही आमच्या या मेहनतीला भरभरुन दाद दिली. मात्र सध्या देशभरात करोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहून रोहितने ही माहिती दिली. ‘सूर्यवंशी’ येत्या २४ मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत कुठलीही माहिती रोहितने दिलेली नाही.
चित्रपटाचे कथानक मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि ही शक्यता रोखण्यासाठी अक्षय कुमारचे आगमन होते. १९९३ साली झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये केवळ एक किलो विस्फोटकं वापरण्यात आली होती. आजही मुंबईत ६०० किलो विस्फोटकं कुठेतही लपवून ठेवण्यात आली आहेत. ही विस्फोटकं शोधण्याच काम अक्षय कुमार सूर्यवंशीच्या या ट्रेलरमध्ये करताना दिसत आहे.