15 December 2018

News Flash

आईच्या निधनानंतर जान्हवी पहिल्यांदाच कॅमेरासमोर

श्रीदेवी लेकीच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप उत्सुक होत्या.

जान्हवी कपूर

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाविश्वात आणि कपूर कुटुंबात एक पोकळी निर्माण झाली. मुलगी जान्हवी कपूरचा पहिलावहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. लेकीच्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी त्या खूप उत्सुक होत्या. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जान्हवी पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. आगामी ‘धडक’ या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून जान्हवी सेटवर परतली आहे.

गुरुवारपासून जान्हवीने शूटिंगचे काम सुरू केले. मुंबईतील वांद्रे येथे सेट असून सध्या तिथेच शूटिंग सुरु आहे. यावेळी दिग्दर्शक शशांक खैतान आणि मुख्य अभिनेता इशान खत्तरसुद्धा तेथे उपस्थित होते. येथील शूटिंग संपल्यानंतर टीम कोलकातासाठी रवाना होणार आहे आणि तिथेच उर्वरित शूटिंग करण्यात येईल.

वाचा : सावत्र बहिणींसोबत एकाच घरात राहणार अर्जुन कपूर?

२४ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनानंतर जान्हवी काही काळ ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या दु:खातून सावरत तिने कामाला सुरुवात केली आहे. जुलैमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ नये यासाठी ती कामावर परतली आहे. सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या फोटोंमधील तिचा लूक पाहता अनेकांना ‘इंग्लिश विंग्लिश’मधील श्रीदेवीच्या भूमिकेची आठवण होत आहे.

First Published on March 9, 2018 10:41 am

Web Title: sridevi daughter janhvi kapoor is back on the sets of dhadak