अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत आकस्मिक निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत बरेच तर्कवितर्क लढविले जात होते. अशातच स्वत:ला श्रीदेवी यांचे निकटवर्तीय म्हणून सांगणारे वेणूगोपाल रेड्डी यांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले होते. एका तेलुगू वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूर यांच्यावर आरोप केले. हे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे.

पुतण्याच्या लग्नानिमित्त श्रीदेवी दुबईला गेल्या असत्या हॉटेलच्या रुममधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूबाबत अद्यापही बरेच तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यातूनच श्रीदेवी यांचे काका असल्याचे सांगत वेणूगोपाल रेड्डी यांनी मुलाखतीदरम्यान बोनी कपूर यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केला होता. ‘अनेक चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटल्याने बोनी कपूर आर्थिक चणचणीत होते. त्यानंतर त्यांनी श्रीदेवींची बरीच संपत्ती विकली होती. यामुळे श्रीदेवी निराश होत्या. संपूर्ण आयुष्यात मानसिक शांती त्यांना कधीच लाभली नव्हती. चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी श्रीदेवी स्वत: मात्र कधीच खूश नव्हती,’ असे रेड्डी त्या मुलाखतीत म्हणाले होते.

वाचा : ‘जान्हवीची श्रीदेवी यांच्याशी तुलना नकोच’

चेन्नईत आयोजित केलेल्या श्रीदेवी यांच्या शोकसभेवेळी त्यांची बहिण श्रीलता आणि त्यांचे पती संजय रामस्वामीदेखील उपस्थित होते. ‘श्रीलताबरोबर लग्न होऊन २८ वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांत मी कधीच वेणूगोपाल यांचे नाव ऐकले नाही. वेणूगोपाल यांच्या म्हणण्यात काहीच तथ्य नाही. आम्ही बोनी कपूर यांच्या पाठीशी आहोत. सध्या आम्ही श्रीदेवी यांच्या निधनावर मौन बाळगायचं ठरवलं आहे,’ असे म्हणत संजय यांनी वेणूगोपाल यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले.