देशात फैलावलेल्या करोना विषाणूचं संक्रमण वाढताना दिसत आहे. परिणामी, लॉकडाउनच्या कालावधीतही वाढ करण्यात येत आहे. सध्या देशात चौथ्या टप्प्यात लॉकडाउन सुरु आहे. या काळात अनेकांना विविध समस्यांना सामोरं जाव लागत आहे. कोणी आर्थिक विवंचनेत आहेत, तर काहींची उपासमार होत आहे. यामध्येच परराज्यातून कामासाठी मुंबई आलेल्या मजुरांची गावी जाण्यासाठी धडपड सुरु आहे. यात अभिनेता सोनू सूदने या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. यामध्येच सध्या अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासनही त्याने दिलं आहे.

लॉकडाउनच्या काळात मजुरांना त्यांच्या गावी जाता यावं यासाठी सरकारने विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. त्यासोबतच सोनू सूददेखील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी मदत करत आहे. यातापर्यंत त्याने कर्नाटक, बिहार, झारखंड येथील मजुरांना त्यांच्या गावी पाठविलं आहे. यामध्येच काही विद्यार्थ्यांनी सोनूकडे मदतीची मागणी करत आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी मदत करा असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे सोनूने तत्परता दाखवत या मुलांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

ठाण्यामध्ये राहणाऱ्या एका मुलाने सोनू सूदला ट्विटवर टॅग करत मदतीची मागणी केली आहे. “मी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचा रहिवासी असून सध्या शिक्षणासाठी ठाण्यात राहतो. मात्र माझी आई आजारी आहे आणि मी इकडे अडकलो आहे. कोणीच माझी मदत करत नाहीये. मला माझ्या गावी गोरखपूरला जायचं आहे, तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. कृपया माझी मदत करा”, असं ट्विट या मुलाने केलं असून सोबत त्याचा फोन नंबरसुद्धा दिला आहे.

या मुलाचं उत्तर पाहिल्यानंतर सोनूने त्याला रिट्विट करत, “तुझ्या आईला कळवं, तू लवकरच तिला भेटायला जात आहेत”. सोनूचं हे ट्विट पाहिल्यानंतर विद्यार्थ्याने त्याला रिअल हिरो म्हणत आभार मानले आहेत.

दरम्यान, सोनू आणि या विद्यार्थ्याचं ट्विट पाहिल्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याने सोनूला मीदेखील गोरखपूरचा रहिवासी असून मला सुद्धा आकाशसोबत घरी जाता येईल का असा प्रश्न विचारला. त्यावर सोनूने त्याचीही मदत करु असं सांगितलं. सोनू गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र गरजुंच्या मदतीसाठी झटत आहे. तो विविध मार्गाने गरजुंपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.