सगळंच गमावून बसलेली ती, जबरदस्त मानसिक धक्क्याखाली आपल्या भूतकाळात गुंतून गेलेली असते. डोक्यात शेकडो विचारांची चक्रं सुरू असतात.
‘तुम दुनिया की सबसे ऊंचाई पर जाना चाहती हो ना? जाओ
तुम्हे कोई नही रोकेगा
पर एक बात याद रखना
जब तुम वहासे निचे देखोगी वहासे तुम्हे कोई अपना नजर नही आयेगा’
बस..नायकाने कोणेएकेकाळी सांगितलेलं शेवटचं वाक्य तिला आठवतं अन् त्या वाक्याचा जबरदस्त आघात तिच्या मनावर होतो. ती आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवते. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘ऐतराज’ या चित्रपटाचा हा अस्वस्थ करून जाणारा शेवट आजही प्रियांकानं रंगवलेल्या खलनायिकेच्या भूमिकेमुळे सगळ्यांनाच आठवत असेल.

अनेक अभिनेत्री खलनायिका रंगवायला कचरतात पण त्यावेळी प्रियांकानं खलनायिका साकरण्याचं आव्हान स्विकारलं. ‘ऐतराज’ चित्रपटातली प्रियांकाचाही ही भूमिका तिच्या करिअरसाठी टर्निंग पाईंट ठरली. कदाचित याच चित्रपटाच्या सिक्वलमध्ये प्रियांका पुन्हा दिसू शकते. चित्रपट निर्माते सुभाष घई या चित्रपटाच्या सिक्वल काढण्यासाठी इच्छुक असून ते गेल्या दोन वर्षांपासून स्क्रिप्टवर काम करत असल्याचं ‘मुंबई मिरर’नं म्हटलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार सुभाष घई यांनी प्रियांकाला याबद्दल विचारले देखील, विशेष म्हणजे प्रियांका देखील ऐतराजच्या सिक्वलमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात सुभाष घई आणि प्रियांका चोप्रानं अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिला नाही. सध्या प्रियांका न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, करिना कपूरदेखील मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा, उत्तम संवाद आणि जोडीला प्रियांकानं रंगवलेली खलनायिका यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. ‘ऐतराज’च्या सिक्वलची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नाही पण, प्रियांकाचे चाहते मात्र तिला पुन्हामोठ्या पडद्यावर खलनायिकेच्या रुपात पुन्हा पाहायला उत्सुक आहेत.