शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची व शिक्षणाची होणारी गळचेपी हा ज्वलंत विषय मांडणारे प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे गाजलेले नाटक आता पुन्हा रंगमंचावर येत आहे. अभिनेता सुबोध भावे हे नाटक रंगमंचावर घेऊन येत आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने या नाटकाबद्दल सांगितलं.

‘वसंत कानेटकरांचं अजरामर नाटक अश्रूंची झाली फुले हे नाटक आम्ही करणार आहोत. साधारणपणे गुढीपाडव्याच्या आसपास हे नाटक रंगमंचावर येईल. त्याचे मोजके प्रयोग महाराष्ट्रातल्या गावोगावी करण्याची इच्छा आहे. त्यामुळे पाच-सहा वर्षांनंतर रंगमंचावर काम करण्याचा आनंद मिळणार आहे. पाच-सहा वर्षे नाटकापासून खूप दूर होतो. कारण वेळच नव्हता त्याची तालीम करायला, प्रयोग करायला. आता या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगमंचावर पाऊल ठेवण्याचा विचार आहे. पन्नासच प्रयोग करणार आहे, खूप करणार नाही. एप्रिलमध्ये साधारणपणे नाटक येईल,’ अशी माहिती सुबोधने दिली.

Video : बाळासाहेबांकडून जॅकी श्रॉफला मिळाली ही मोलाची शिकवण

या नाटकातील बाकी कलाकार कोण असतील, निर्माते-दिग्दर्शक कोण हे लवकरच जाहीर करणार असल्याचं त्याने यावेळी सांगितलं. ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी २००२ पर्यंत या सदाबहार नाटकाचे ११११ प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओत सुबोधने चित्रपट दिग्दर्शनाबद्दलही वक्तव्य केलं आहे. ‘दिग्दर्शनासाठी काही चित्रपट डोक्यात आहेत. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाची कथा जशी सुचली तशी कथा सुचल्यास नक्कीच दिग्दर्शनाचा विचार करेन. तीन-चार विषय डोक्यात आहेत पण सध्या स्क्रिप्टींगचं सुरू आहे. लेखकांशी चर्चा सुरू आहे. मनासारखं जोपर्यंत स्क्रीप्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात अर्थ नाही. कदाचित यावर्षी एखादा स्क्रिप्ट पूर्ण होईल आणि ते शूट करू शकेन अशी आशा आहे,’ असं तो म्हणाला.