कपिलच्या शोला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोवर, शिल्पा शिंदे नवा कोरा शो घेऊन येत आहे. सुनील आणि कपिलच्या जोडीनं कोणेऐकेकाळी छोट्या पडद्यावर आपल्या विनोदांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. पण गेल्यावर्षी झालेल्या वादामुळे मात्र या दोघांच्या मैत्रीत कायमची दरी निर्माण झाली. कपिलचा शो सुरू होऊन आठवडाच झाला आहे. अनेकांनी कपिलला सुनीलच्या सहभागावरून प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. साहिजकच हेच प्रश्न सुनीललाही विचारण्यात आले पण मोठ्या खुबीनं त्यानं याचं उत्तर देत तुर्तास चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कपिलसोबत पुन्हा काम करणार का? असा प्रश्न विचारताच सुनीलनं कपिलविषयीच्या वादाला फारसं महत्त्व न देता सारवासारव केली. देवाची इच्छा असेल तर नक्की कपिलसोबत काम करेन असं सुनील म्हणाला आहे. ‘मी कपिलसोबत काम केलंय त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच सुखद होता. कपिल एक कुशल अभिनेता आहे आपल्या विनोदातून तो नेहमी प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्यानं असंच आपल्या विनोदातून प्रेक्षकांचं मनोरंजन करावं जर नशीबात असेल तर त्याच्यासोबत भविष्यात नक्कीच काम करेन’ असं म्हणत सुनीलनं वेळ मारून नेली.

कपिलचा ‘फॅमिली टाईम्स…’ हा शो येण्यापूर्वी कपिल आणि सुनीलमध्ये ट्विटवर चांगलाच वाद झाला होता. नवीन शोसाठी मला विचारण्यात आलं नाही, कपिलच्या फोनची वाट पाहिली अखेर मी दुसरा शो करण्याचं ठरवलं असं सुनीलनं म्हटलं होतं. कपिलनं मात्र यावरून सुनीलला खोटारडं ठरवलं होतं. त्याला मी शंभर फोन केले. पण त्यानं एकदाही फोन उचलला नाही, असं कपिल म्हणाला. दरम्यान सुनीलनं बिग बॉस सिझन ११ ची विजेती शिल्पा शिंदे सोबत हातमिळवणी केली ‘दे दना दन’ या वेब शोमधून हे दोघंही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या वेब शोचा फर्स्ट लूक नुकताच शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला.