उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच आता काही राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले असून उमेदवार निवडून यावा यासाठी प्रचार करण्यासही सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष प्रचारात कोणतीही कसर राहू देत नाहीये. दरम्यान, मोरादाबाद मतदार संघात लावण्यात आलेले एक पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे. या पोस्टरचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचा. पण, हा फोटो कितपत खरा आहे याबद्दल काहीच सांगता येत नाही. एखाद्या नेटिझनने फोटोशॉपवर सनीचा फोटो एडिट केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

phpthumb_generated_thumbnail

सनी लिओनीचा दूर दूरपर्यंत राजकारण किंवा निवडणूकीशी जराही संबंध नसला तरी उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत या फोटोने मात्र चांगलाच रंग भरला आहे. प्रत्येकजण या फोटोची चर्चा करण्यात गर्क झाला आहे. या फोटोत सनी लिओनीला चक्क उमेदवार म्हणून निवडणूकीच्याच रिंगणात उभे केले आहे. अभिनेत्री सनी लिओनीला मोरादाबाद विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिलेला हा प्रतिकात्मक फोटो पाहून अनेकांच्या भूवया उंचावत आहेत. मोरादाबाद जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी सनी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार ते या पोस्टरवर लिहिलेले नाही.

प्रत्यक्षात मोरादाबादमधील लोकांच्या या फोटोवर वेगवेळळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सनीच्या केवळ एका फोटोचीच इतकी चर्चा होत आहे. विचार करा, जर प्रत्यक्षातच सनी निवडणूकीला उभी राहिली तर काय होईल. दरम्यान, काहींनी हा फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून एडिट केला असल्याचे म्हटले आहे. तर कोणी म्हणते ज्याने कुणी हा फोटो लावला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दुसरीकडे, काहींनी तर सनीला उमेदवार म्हणून स्वीकारले असून, ते तिचा प्रचार करण्यासही तयार आहेत. काही उत्साही युवकांनी तर, आम्ही तिचा प्रचार धुमधडाक्यात करू असेही म्हटले आहे.