बॉलिवूडमध्ये विज्ञान चमत्कृतीवर आधारित मोजकेच चित्रपट आतापर्यंत आले असून त्यामध्ये हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’चा आघाडीचा क्रमांक लागतो. आता निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशनच्या ‘क्रिश थ्री’ या सीक्वेलपटात हृतिक रोशन अधिक आकर्षक रूपात दिसणार आहे. एवढेच नव्हे तर हृतिक रोशनचे शरीरसौष्ठवही चित्रपटातून दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना ‘क्रिश थ्री’ हा चित्रपट पर्वणी ठरेल अशी चर्चा आहे. हृतिक रोशनचा हा ‘सुपरहिरो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना जिंकून घेणार असेही मानले जात आहे.
अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांवर मात करून हृतिक रोशनने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून क्रिस गेथिन आणि त्याची बायको मॅराशिया जॉन्सन या अमेरिकन दाम्पत्याकडून उत्कृष्ट शरीरसौष्ठवासाठीचे प्रशिक्षणही त्याने घेतले आहे. त्यामुळे ‘क्रिश थ्री’मध्ये हृतिक त्याच्या चाहत्यांना अधिक आकर्षक व्यक्तिमत्वात दिसणार आहे, असे समजते. प्रशिक्षण घेताना एखाद्या चांगल्या विद्यार्थ्यांप्रमाणे हृतिक वागला. मेहनत घेतली. त्यामुळे त्याला प्रशिक्षण देणे आमच्यासाठी सोपे ठरले. त्याच्या पूर्वीच्या व्यक्तिमत्वापेक्षा ११० टक्के त्याचे शरीरसौष्ठव आणि एकूणच पडद्यावरचा वावर लोकांना नक्कीच आवडेल असा असेल, असे मत अमेरिकन प्रशिक्षक दाम्पत्याने व्यक्त केले आहे. ‘कोई मिल गया’ आणि नंतरचा ‘क्रिश’ या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच ‘क्रिश थ्री’मध्येही हृतिकच्या व्यक्तिरेखेचे नाव रोहित मेहरा आणि ‘क्रिश’ अवतारातील कृष्णा मेहरा असेच असेल. प्रियांका चोप्रा, कंगना राणावत या दोन अभिनेत्रीही यात झळकणार असून दिवाळी दरम्यान नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘कोई मिल गया’ हा चित्रपट २००३ साली तर ‘क्रिश’ हा चित्रपट २००६ साली आला होता. परंतु, याच मालिकेतील तिसरा सीक्वेलपट तब्बल ७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर येणार असून त्यामुळे बदललेल्या काळानुसार चित्रपटाच्या कथानकात आणि मांडणीत कोणते बदल केले असतील याबाबत चित्रपटसृष्टीतही उत्सुकता निर्माण झाली आहे. विज्ञान चमत्कृतीपर चित्रपट असल्यामुळे ‘क्रिश थ्री’ हा चित्रपट थ्रीडीमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.