अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे जाताच त्यांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. सीबीआयचं एक विशेष पथक या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे. या पथकामध्ये मुजफ्फरपूरच्या आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर यांचाही समावेश आहे.

गगनदीप या २००४च्या गुजरात कॅडरच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलंय. गेल्या दीड वर्षापासून त्या सीबीआयमध्ये काम करत आहेत. अनेक मोठ्या आणि चर्चेत असलेल्या घोटाळ्यांसह हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपाससुद्धा गगनदीप यांनी केला आहे.

गगनदीप यांचं शालेय शिक्षण मुजफ्फरपूरमध्येच झालं. शाळेत असल्यापासूनच त्या मेहनती व बुद्धिमान आहेत असं त्यांचे वडील योगेंद्र सिंह गंभीर यांनी सांगितलं. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी गगनदीप पंजाबला गेल्या. पंजाब विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं.

सीबीआयने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.