अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयच्या १५ सदस्यांच्या ५ टीम करण्यात आली असून तपासाला वेग आला आहे. यामध्येच सुशांतच्या घरी १४ तारखेला एका चावीवाल्याला बोलविण्यात आलं होतं ही नवीन माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चावीवाल्याने केलेल्या वक्तव्यामुळ अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.

‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, १४ जून रोजी सिद्धार्थ पिथानीने एका चावीवाल्याला सुशांतच्या घरी बोलावलं होतं. दरवाज्या उघडण्यासाठी सिद्धार्थने चावीवाल्याला चक्क २ हजार रुपये दिले होते आणि काम झालं की लगेच जायचं असंही सांगितलं होतं, अशी माहिती चावीवाल्याने दिल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- सीबीआयचं पथक पोहोचलं सुशांत सिंहच्या घरी; पाहणी करतानाचे फोटो आले समोर

“मला १४ जून रोजी दुपारी १ वाजून ५ मिनीटांनी सिद्धार्थ पिथानीचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना व्हॉट्स अॅपवर कुलूपाचा फोटो पाठविण्यास सांगितलं. फोटो पाहिल्यानंतर मी सुशांतच्या घरी सहाव्या मजल्यावर पोहोचलो आणि  कुलूप उघडण्यास सुरुवात केली. पण ते सुशांतचं घर आहे हे मला माहित नव्हतं. मी काम करत असतानाच दरवाजा तोडून टाक असं मला सांगण्यात आलं. तसंच आतून जर कोणता आवाज आला तर काम लगेच थांबव असेही मला सांगण्यात आलं होतं”, असं चावीवाल्याने सांगितलं.

आणखी वाचा- ‘तो फोन कोणी केला?, मृतदेह आधी कोणी पाहिला आणि…’; सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंहला CBI ने विचारले हे दहा प्रश्न

पुढे तो म्हणतो, “सुशांतच्या दरवाजाचं लॉक हे कम्प्युटराइज होतं. त्यामुळे हातोडीच्या सहाय्याने ते तोडावं लागलं. त्यानंतर मला या कामाचे २ हजार रुपये देण्यात आले आणि लगेच जायला सांगितलं. परंतु, मला घरात जाण्याची किंवा आता कोण आहे हे पाहण्यास मनाई केली होती”.

दरम्यान, सीबीआयची १० सदस्यीय टीम गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे.