अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयने ६ जुलै रोजी सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी ही सहा नावं आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर आठ तारखेपासून या प्रकरणाशी संबंधित सर्व जणांची सक्तवसुली संचलनालयानेही (ईडी) चौकशी सुरु केली आहे. याच चौकशीदरम्यान श्रृतीने रिया आणि सुशांतसंदर्भात काही महत्वाचे खुलासे केले आहेत.

रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची एक्स मॅनेजर असणाऱ्या श्रुती मोदीने रियाच सुशांतच्या वतीने अनेक आर्थिक आणि प्रोफेश्नल निर्णय घ्यायची असं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. ‘सुशांत आणि रिया एकमेकांना डेट करुन लागल्यानंतर काही महिन्यांनी माझी त्यांच्याशी कामानिमित्ताने ओळख झाली. मला त्यांच्या आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर बेकायदेशीर देवाणघेवाणीसंदर्भात कोणतीच कल्पना नाहीय. मात्र रिया ही सुशांतच्या वतीने अनेक निर्णय घ्यायची. यामध्ये अगदी आर्थिक निर्णयांपासून ते प्रोफेशनल (चित्रपटांसंदर्भातील) निर्णयांपर्यंत सर्वच प्रकारच्या गोष्टींचा समावेश होता,’ असं श्रृतीने सांगितल्याचं वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिलं आहे.  सुशांतच्या कंपनीत काम करणारी श्रृती ही रिया आणि शोविकचं सर्व काम पाहायची. श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तीने जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळावधीमध्ये सुशांतसोबत काम केलं होतं. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करताना रियासोबतच श्रुतीचंही नाव घेतलं होतं. त्यामुळेच सुशांत, रिया आणि शोविकचे अनेक आर्थिक व्यवहारांची श्रृतीला माहिती असल्याने तिची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

ईडीने सुशांतच्या चार बँक खात्यांच्या घडलेल्या प्रत्येक व्यवहारांची बारकाईने तपासणी केली आहे. तसेच सुशांतने कुटुंबियांच्या नावे सुरू के लेल्या नियत ठेव/मुदत ठेव (फिक्स डिपॉझीट) खात्यांचेही तपशील तपासले आहेत. सुशांत संचालक असलेल्या तीन कंपन्यांची निर्मिती, त्यातील गुंतवणूक, कं पन्यांचा व्यापार, नफा-तोटा आदी बाबीही ईडीने तपासल्या आहेत. आठ ऑगस्ट रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिया आणि शोविकची दिवसभर चौकशी केली. शोविक आणि  सुशांत यांनी दोन कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांमध्ये दोघे संचालकपदावर होते.