बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन काही आठवडे उलटले आहेत. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही. अनेकांच्या मते नैराश्यात येऊन त्याने हे पाऊल उचललं, तर काहींच्या मते बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवलं. परंतु, अद्यापही सुशांतच्या आत्महत्येमागील ठोस कारण स्पष्ट झालेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर गुगलवर डिप्रेशन हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला. मात्र, सुशांतने आत्महत्येपूर्वी गुगलवर नेमकं काय सर्च केलं होतं, हे त्याच्या मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलं आहे. त्यानुसार, सुशांतने स्वत:चचं नाव सर्च केल्याचं म्हटलं जात आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर जवळपास २८ जणांचा जबाब नोंदविण्यात आला आला. त्यानंतर आता सुशांतचा मोबाईल फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही वेळापूर्वी गुगलवर स्वत:चचं नाव सर्च केलं होतं, असं ‘झी न्यूज. इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर त्याच्यावरील काही आर्टिकल्स आणि काही बातम्या वाचल्या होत्या. सुशांतने १४ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता हे गुगल सर्च केलं होतं.

दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. काहींच्या मते, ही आत्महत्या नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सुशांतच्या चाहत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.