अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आता गळफास घेण्यासाठी वापरलेल्या त्या हिरव्या कपड्याच्या क्षमतेची तपासणी होणार आहे. सुशांतने खरंच त्या कपड्याचा वापर करून आत्महत्या केली का, त्या कपड्याची क्षमता सुशांतचं ८० किलो वजन पेलवणारी होती का, याचा तपास केला जाणार आहे. सुशांतने गळफास घेण्यासाठी हिरव्या रंगाच्या नाइट गाऊनचा वापर केला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुशांतच्या अंतिम शवविच्छेदन अहवालात गळफासाने श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तरी त्याच्या आत्महत्येप्रकरणी इतर सर्व बाबींचा कसून तपास मुंबई पोलीस करत आहेत. याप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही चौकशी होणार आहे. वांद्रे पोलिसांनी त्यांना समन्स पाठवले आहेत. भन्साळींनी सुशांतला चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र दुसऱ्या एका मोठ्या बॅनरसाठी काम करत असल्यामुळे भन्साळींसोबत त्याला काम करता आलं नाही. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस भन्साळींची चौकशी करणार आहेत.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत २५ हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. सुशांतचा मॅनेजर, पीआर मॅनेजर, स्वयंपाकी, त्याचे वडील, तीन बहिणी, कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सहकलाकार संजना सांघी, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.