अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच रिया आपल्या घरातून गायब झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. परंतु या प्रकरणात आता थेट ईडीने देखील उडी घेतली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाचे धारेदोरे आर्थिक बाबींशी जोडले असल्याचा संशय ईडीला आहे. परिणामी त्यांनी रिया चक्रवर्तीला समन्स जारी केलं आहे. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार समन्स मिळताच रिया आपल्या घरी परतली आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असं म्हटलं. तसंच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे चौकशीसाठी शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी रियाला ईडीसमोर हजर राहायचे आहे.

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.