अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू असतानाच सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या तक्रारीमुळे संपूर्ण तपासाला आता वेगळं वळण लागलं आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: “असत्याचा पराभव निश्चित”; अभिनेत्याचं रियाच्या वकिलांना आव्हान

अंकिता लोखंडे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. आज तकला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “सुशांत नैराश्यामध्ये जाणं शक्यच नाही. कारण त्याने अनेक मोठमोठ्या संकटांचा सामना करुन यश मिळवलं होतं. त्याच्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांकडे त्याचा नवा नंबर नव्हता. त्याच्या वडिलांनी एकदा मला फोन करुन सुशांतशी बोलणं होत नसल्याचं सांगितलं होतं. त्याची बहीण देखील तब्बल एक वर्षानंतर मे महिन्यात त्याच्यासोबत बोलली होती. सुशांत इतके दिवस आपल्या कुटुंबीयांशिवाय राहूच शकत नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यासोबत नक्कीच काही तरी विचित्र घटना घडल्या आहेत.” असा अनुभव अंकिताने सांगितला.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात मंगळवारी रात्री पाटणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यात सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे. “सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्ही सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.