अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी (१४ जून) मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून सुशांतचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आलं. मात्र पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी सुशांतच्या चाहत्यांमधून जोर धरु लागली आहे. यात अभिनेता शेखर सुमनने देखील या प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

“सुशांत हा संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. येथील प्रत्येक व्यक्ती तुझ्यासोबत आहे. आम्ही सगळे तुला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतोय आणि हो तुला न्याय मिळेलच”, असं म्हणत शेखर सुमन यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

पुढे ते म्हणतात, “सुशांत सिंह राजपूतने केलेली आत्महत्या ही साधी आत्महत्या होती असं घोषित करण्यात आलं आहे. पण त्यावर विश्वास ठेवू नका. मला शंका आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, की या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करावी”.

शेखर सुमन यांनी #justiceforSushantforum या नावाचं एका फोरमचीही सुरुवात केली असून या अंतर्गत सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करण्याची मागणी करा अशी विनंती केली आहे.

दरम्यान, सुशांतचा शवविच्छेन अहवाल आल्यानंतर त्यात सुशांतने गळफास घेतल्यामुळे त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र अनेकांनी पुन्हा एकदा या प्रकरणी चौकशी करा म्हटलं आहे. विशेष म्हणजे शेखर सुमन यांनी सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. त्यांच्या प्रमाणेच अभिनेत्री रुपा गांगुली यांनीही या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी असं म्हटलं आहे.