प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी घटना १४ जून रोजी घडली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या कलाकाराच्या निधनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. यातील अनेक प्रश्न हे कलाविश्वातील घराणेशाहीकडे झुकणारे असल्याचं दिसून आलं. सुशांतचा मृत्यु होऊन १४ दिवस होत आले. त्यामुळे आता चाहत्यांना त्याच्या मृत्यूबद्दलची अधिक माहिती अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या एका क्रिकेटपटूने प्रसारमाध्यमांवर टीका केली.

“तैमूरच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत, त्यातून पत्रकारांनी जागं व्हावं आणि सुशांत सिंग राजपूतबद्दलच्या बातम्यांचे गांभीर्याने वार्तांकन करावं. त्याच्या आत्महत्येनंतर कोणीही चर्चासत्र आयोजित केली नाहीत. सध्या संपूर्ण देशाला सुशांतच्या प्रकरणाबद्दल जाणून घ्यायचं आहे”, अशा शब्दात टीम इंडियाचा फलंदाज मनोज तिवारी याने प्रसारमाध्यमांवरील संताप व्यक्त केला.

सुशांत सिंह राजपूतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण लॉकडाउन काळात त्याला काही घटनांमुळे नैराश्य आलं आणि त्यातून त्याने आत्महत्येचा पर्याय स्वीकारला, अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, फलंदाज मनोज तिवारी या आधी काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. मनोजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करूनही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही. संघातून सतत आत-बाहेर होण्यामागे त्या दुखापतीही कारणीभूत ठरल्या. त्यामुळे फेब्रुवारी २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करूनदेखील त्याने केवळ १२ वन डे आणि तीन टी २० सामन्यांमध्येच टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ‘आयपीएल फ्रीक’ नावाच्या एका क्रिकेट फॅन पेजने मनोजचा समावेश भारताच्या ११ ‘फ्लॉप’ क्रिकेटपटूंमध्ये केला होता. त्यामुळे त्याची पत्नी चांगलीच संतापली होती.