अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही हिंदी चित्रपट सृष्टीबरोबरच सुशांतचे चाहतेही अजून या धक्क्यामधून पूर्णपणे सावरु शकलेले नाहीत. सुशांतसारखा तरुण कलाकाराने अशापद्धतीने टोकाचा निर्णय घेत जगाचा निरोप घेतल्यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. स्वत:च्या ‘छीछोरे’ चित्रपटामधून आत्महत्या न करण्याचा सल्ला देणाऱ्या सुशांतनेच स्वत:च आयुष्य असं का संपवलं असेल यासंदर्भात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. सुशांत मागील बऱ्याच काळापासून नैराश्येचा सामना करत होता. चित्रपटांमध्ये काम न मिळणे, डावलले जाणे, घराणेशाही यासारख्या मुद्द्यांमुळे नैराश्येतून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात आवाज उठवला आहे. त्याचबरोबर सुशांतचे अनेक जुने व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत.

दिग्दर्शक करण जोहरने सुशांतला वाहिलेली श्रद्धांजली आणि त्यानंतर त्याच्यावर तसेच आलिया भट्ट्वर सुशांतच्या चाहत्यांनी कॉफी विथ करणमधील एका कार्यक्रमात केलेली सुशांतबद्दलची वक्तव्य यावरुन चांगलीच टीका झाली. मात्र याच कार्यक्रमामध्ये सहभागी इम्रान हाश्मी सहभागी झाला होता. त्यावेळी सुशांतबद्दल त्याने व्यक्त केलेलं मत आता व्हायरल होताना दिसत आहे. महेश भट्ट आणि इम्रान करणच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी करणने इम्रानला एक प्रश्न विचारला. यापैकी कोणत्या कलाकाराचं भविष्य जास्त उज्वल आहे असं तुला वाटतं?, असा प्रश्न करणने विचारला. त्याने या प्रश्नासाठी सुशांत सिंह राजपूत, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, आदित्य रॉय कपूर असे सहा पर्याय दिले होते. करणने पर्याय सांगू झाल्यानंतर पुढच्या क्षणाला इम्रानने सुशांतचे नाव घेतलं होतं. त्या खालोखाल वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राला संधी आहे असंही इम्रान म्हणाला होता. हा व्हिडिओ आता व्हायरल होताना दिसत आहे.

ही मुलाखत २०१४ सालातील असून त्यावेळी नुकतचं सुशांतने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. २०१३ साली सुशांतने काय पो छे! या चित्रपटातून आपल्या बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली होती. सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा होता. तो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला होता. ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम या इंजिनियरिंगच्या प्रवेश परिक्षेमध्ये तो देशात सातवा आला होता. त्यानंतर सुशांतने केमिकल इंजिनिअरींगला प्रवेशही घेतला. मात्र यामध्ये आपले मन रमत नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने दुसऱ्या वर्षी हे शिक्षण सोडून दिले आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे करियर करायचे असे ठरवले होते.