अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात आता अनेक आरोप होताना दिसत आहेत. सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात सुशांतच्या वडिलांची बाजू मांडत असलेले वकील विकास सिंह यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. मुंबई पोलिसांतील कुणीतरी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सुशांत सिंह याचे वडील के.के. सिह यांचे वकील विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना हा दावा केला आहे. विकास सिंह म्हणाले,”जर ती (रिया चक्रवर्ती) सर्वोच्च न्यायालयात गेली असेल, तर तिने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करायला हवी. पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे आणि आता तिने (रिया) बिहार पोलिसांच्या चौकशीला स्थगिती देण्याची व याचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपवण्याची मागणी केली आहे. मग मुंबई पोलिसातील कुणीतरी तिला मदत करत आहे, यासाठी यापेक्षा मोठा पुरावा कोणता हवाय,” असं विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.

सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर रिया चक्रवर्तीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाटणा पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात यावा. तसेच याप्रकरणी बिहार पोलीस करत असलेल्या चौकशीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी तिने केली आहे.

३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशी म्हटलं गेलं होतं. मात्र, त्यानंतर आता या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरु असून, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे.