बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कलाविश्वात एकप्रकारची शांतता पसरली आहे. प्रत्येक कलाकार स्तब्ध झाला असून अनेकांना या धक्यातून सावरणं कठीण झालं आहे. यातच अभिनेत्री सुष्मिता सेनने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपण दु:ख लपवण्यात खरंच खूप माहीर झालो आहोत का? की आपल्याकडे हे सगळं पाहण्यासाठी वेळचं उरला नाहीये, असं सुष्मिता म्हणाली आहे. तसंच तिने या पोस्टमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य करुन प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं आहे.
सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर सुष्मिताने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिताने या पोस्टमधून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोबतच जीवन इतकं स्वस्त नाही हेदेखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
“कसं बोलावं आपण सगळेच आपलं दु:ख लपवण्यात माहीर झालो आहोत का..की कोणाकडेच हे सारं पाहण्यासाठी वेळ नाहीये. आयुष्य जगत असताना प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं दडपण असतंच. आयुष्यात असे चढ-उतार येतच असतात. मात्र कायम संघर्ष केला पाहिजे. यावर विजय मिळवला पाहिजे. हार पत्करुन चालणार नाही. जर थकल्यासारखं वाटत असेल तर थोडावेळ विश्रांती घ्या पण डाव मोडू नका. आपण हे जग बदलू शकत नाही. पण आपल्या विचारांची दिशा नक्कीच बदलू शकतो. देवावर विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात आपणच आनंद आणू शकतो. आयुष्य हे मिळालेली एक देणगी आहे. त्यामुळे कधीच हार पत्करु नका”, असं सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान,कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. यात प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, सारा अली खान, रणवीर सिंग,दीपिका पदुकोण, सलमान खान, शाहरुख खान, मीरा चोप्रा रविना टंडन, उर्वशी रौतेला, प्रविण तरडे, एकता कपूर अशा अनेकांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.