अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी अभिनेत्री झायरा वसीमने घेतलेल्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इतकंच नव्हे तर हिंदू अभिनेत्रींनी झायराचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. झायराने रविवार (३० जून) सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. ”हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यावरून भरकटले होते,” असं लिहित तिने पाच वर्षांचं अभिनय क्षेत्रातील करिअर संपुष्टात आणल्याचं सांगितलं.

झायराने हा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी चक्रपाणी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ”धर्मामुळे चित्रपटसृष्टी सोडण्याचा झायराचा निर्णय कौतुकास्पद आहे. हिंदू अभिनेत्रींनीही झायराचा आदर्श घ्यावा,” असं ते म्हणाले.

वाचा : झायरा वसीमचा बॉलिवूड सोडण्याचा निर्णय; शिवसेना म्हणते..

झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. झायराच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दबावाखाली येऊन तिने हा निर्णय घेतल्याचं मत काहींनी व्यक्त केलं. तर काहींनी तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणाला नाही, असं म्हणत बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या झायराच्या अभिनय कौशल्याचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. मात्र या क्षेत्रासाठी मी जरी योग्य असले तरी इथे मी खूश नाही, अशी खंत तिने तिच्या पोस्टमध्ये व्यक्त केली. कुराणातील बरेच संदर्भ देत तिने तिच्या निर्णयामागचं कारण सांगितलं.