‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’नंतर समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन महिलांच्या संबंधांवर बेतलेल्या ‘शीर कूर्मा’ चित्रपटात स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता प्रमुख भूमिकेत दिसतील. फराझ आरिफ अन्सारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यामध्ये महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारणार आहेत.

स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आणि कुटुंबानं स्वीकारावं यासाठी झगडणाऱ्या एका महिलेचा प्रवास शीर कूर्मामध्ये दाखवण्यात आला आहे. फराझ यांनी याआधी सिसक चित्रपट दिग्दर्शित केला होता. एलजीबीटीक्यू समुदायातील प्रेम कथेवर बेतलेला हा भारतातील पहिलाच चित्रपट होता.

#SmilePleaseAnthem : सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे गाणे नक्की बघा

दिव्या आणि स्वरा बॉलिवूडमधील दोन महत्त्वाच्या अभिनेत्री असून त्यांचा एलजीबीटीक्यू समुदायाशी खूप जवळून संबंध आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधणं सोपं गेल्याचं फराझ यांनी सांगितलं. चित्रपटाचं कथानक लिहित असतानाच दिव्याचा विचार माझ्या डोक्यात आला होता. या चित्रपटात ती कशी भूमिका साकारेल, याची कल्पना मी आधीच करू लागलो होतो, असंदेखील ते म्हणाले.

‘सिसक’च्या यशानंतर शीर कुर्माची कथा सुचायला बराच अवधी लागला. कारण भारतात अशा प्रकारचा चित्रपट तयार करणं कायमच आव्हानात्मक असतं. त्यात जर चित्रपटात एखादा पुरुष मुख्य भूमिकेत नसेल, तर हे आव्हान कित्येक पटीनं वाढतं, असं फराझ यांनी सांगितलं. स्वरा गेल्या वर्षी वीरे दी वेडिंग चित्रपटात दिसली होती. स्वरानं नव्या चित्रपटाची माहिती ट्विटरवर दिली.