छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सुंदरलालला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली. त्यानंतर आता मालिकेतील मिस्टर भिडे म्हणजे मंदार चांदवडकरला देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या मंदारवर उपचार सुरु असून तो होम क्वारंटाइन आहे.

करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे मंदार होम क्वारंटाइन आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. ‘आजतक’ शी बोलताना मंदार म्हणाला, ‘हो, माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण मला करोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. मी स्वत:ची काळजी घेत आहे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी करत आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे.’

पाहा : ‘तारक मेहता…’मधील रिटा रिपोर्टरचा बिकिनी लूक, मालदीवमधील फोटो व्हायरल

पुढे ते म्हणाले, ‘मी करोना चाचणीचे रिपोर्ट्स येण्याआधीच स्वत:ला आयसोलेट केले होते. कारण मला सारखे वाटत होते की मला करोना झाला आहे. सध्या मी आणि माझे कुटुंब काळजी घेत आहोत. आशा करतो लवकर मी लवकरच चित्रीकरण सुरु करेन.’

काही दिवसांपूर्वी दयाबेनचा भाऊ सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानी आणि त्याची पत्नी हेमाली यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मयूर सध्या अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहे तर त्याची पत्नी होम क्वारंटाइन आहे.