राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. त्यामुळे राज्य शासन करोना प्रतिबंधासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पाठोपाठ आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी करोनाची लस घेतली आहे.

दिलीप जोशी यांनी मुंबईमधील होली स्पिरिट या रुग्णालयात करोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला आहे. दिलीप यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच चाहत्यांना देखील लस घेण्याची विनंती केली आहे.

फोटो शेअर करत दिलीप जोशी यांनी, ‘मी आणि माझ्या पत्नीने करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लस घेण्यास तुम्ही पात्र असाल किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांपैकी कोणी लस घेण्यास पात्र असेल तर त्यांना लस घेण्यास मदत करा. होली स्पिरिट रुग्णालयातील स्टाफचे आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

दिलीप जोशी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने तर ‘बापूजींना लस दिली की नाही?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने जेठालालची नकल करत ‘अब आपको कोई तकलीफ नही होगी’ असे म्हटले आहे.

१ एप्रिल पासून ४५ वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक कलाकार लस घेताना दिसत आहे. अभिनेत्री मलायका अरोरा, राकेश रोशन, सलमान खान, संजय दत्त, रोहित शेट्टी, शर्मिला टागोर आणि इतर काही कलाकारांनी लस घेतली आहे.