‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोचा १४ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताची. मात्र तिने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचा विचार अद्याप तिने केलेला नाही.

मुनमुन दत्ता ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. तिला देखील ‘बिग बॉस’मध्ये भाग घेण्याबाबत विचारण्यात आलं होतं अशी चर्चा होती. मात्र त्या याबाबत तिने खुलासा केला आहे. “मी बिग बॉसच्या १४ व्या पर्वात भाग घेतेय या खोट्या बातम्या आहेत. मला हा शो पाहायला आवडतो. मात्र ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचा विचार मी अद्याप केलेला नाही. कृपया खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, धन्यवाद.” अशा आशयाची पोस्ट मुनमुनने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

‘बिग बॉस’ हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो आहे. त्यामुळे यामध्ये जाण्यासाठी अनेक कलाकार प्रयत्न करत असतात. या पार्श्वभूमीवर मुनमुनने घेतलेला हा निर्णय ‘बिग बॉस’ चाहत्यांना चकित करणारा आहे. अनेकांनी ट्विट करुन आपलं आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘बिग बॉस’चा तेरावा सिझन फार चर्चेत होता. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने शोचं विजेतेपद जिंकलं होतं. तर असिम रियाज आणि शहनाज गिल दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते.