करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ठप्प पडलेला मनोरंजन उद्योग आता हळूहळू पुन्हा एकदा सुरु होत आहे. सरकारने नियमांचे पालन करुन चित्रीकरणास परवानगी दिली आहे. मात्र परवानगी मिळाली असताना देखील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे चित्रीकरण अद्याप सुरु करणार नाही असा निर्णय निर्माता आसित मोदी यांनी घेतला आहे. परिणामी चाहत्यांना आणखी काही काळ मालिकेचे जूनेच भाग पाहून आपलं मनोरंजन करावं लागणार आहे.

आसित मोदी यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत चकित करणारे खुलासे केले. ते म्हणाले, “चित्रीकरणाच्या शर्यतीत आम्ही भाग घेणार नाही. मुंबईवरील करोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. दररोज शेकडो लोकांना करोनाची लागण होत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत चित्रीकरण करणं थोडं धोकादायकच आहे. तसेच वाढता धोका पाहून सरकार पुन्हा एकदा चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकते. त्यामुळे नवे भाग शूट करण्यापूर्वी आम्ही आणखी काही काळ वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.” निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र तारक मेहता का उल्टा चष्माचे नवे भाग पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गोकूलधाम नावाच्या एका सोसायटीमध्ये घडणाऱ्या गंमती जंमती या मालिकेमध्ये दाखवल्या जातात. लॉकडाउनच्या काळातही या विनोदी मालिकेची लोकप्रियता बिलकूल कमी झालेली नाही. किंबहूना TRPच्या बाबतीत ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकेशी तारक मेहता स्पर्धा करताना दिसत आहे.