News Flash

चित्ररंजन : ऐतिहासिकपटाचा गड राखला

शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले अथक प्रयत्न, त्यांची आणि त्यांच्या प्रत्येक मावळ्याची शौर्यगाथा मराठी माणसांच्या तोंडी असते.

(संग्रहित छायाचित्र)

 

रेश्मा राईकवार

ऐतिहासिक घटना, व्यक्तींवरचे चित्रपट म्हटले की प्रेक्षकांच्याही मनात धडकी भरते. मुळात इतिहास म्हटला की वास्तव आणि त्याबद्दलचे उपलब्ध संदर्भ याबद्दलची संदिग्धता कायम असते. अशावेळी त्यातले जे सत्य आहे, वास्तव आहे त्याला धक्का न लावता अभ्यास-संशोधन आणि तर्काच्या आधारे त्याची समतोल मांडणी करणे हे लेखक-दिग्दर्शकासमोरचे कडवे आव्हान असते. त्यातही हा चित्रपट हिंदीत भव्य प्रमाणावर करायचा असेल तर त्याची प्रभावी हिरोवाली मांडणी गरजेची असते. ही सगळी गणिते व्यवस्थित सांभाळून तान्हाजी मालूसरे यांची शौर्यगाथा भव्यदिव्य रुपात मांडण्यात दिग्दर्शक ओम राऊत यांना हिंदीतील पहिल्याच पदार्पणात यश मिळाले आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले अथक प्रयत्न, त्यांची आणि त्यांच्या प्रत्येक मावळ्याची शौर्यगाथा मराठी माणसांच्या तोंडी असते. पण हा कधीतरी वाचलेला, ऐकलेला, अभ्यासलेला क्वचित कुठे नाटक-चित्रपटातून पाहिलेला इतिहास इतक्या भव्य स्वरुपात रुपेरी पडद्यावर जिवंत होतोय म्हटल्यावर प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच असते. गेल्या वर्षभरात तर मराठेशाहीच्या इतिहासाची पाने रुपेरी पडद्यावरून इतक्या झर्रकन लोकांसमोर जिवंत होत आहेत की आनंदाला एकच उधाण आले आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर ’ हा त्याचा या वर्षांतला कळसाध्याय होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण मुळात तरुण मराठी दिग्दर्शकाचा हिंदी चित्रपट  करण्याचा हा पहिलाच प्रयत्न, त्यातही पहिल्याच प्रयत्नात त्याने ऐतिहासिकपटाचे आव्हान स्वीकारले होते. इथवरच हे थांबले नाही. थ्रीडी तंत्रज्ञानात तयार झालेला हा ऐतिहासिकपट आणि जोडीला अजय देवगण, काजोल, सैफ अली खानसारखे हिंदीत ग्लॅमरस म्हणून यशस्वी ठरलेले मोठे चेहरे. या सगळ्यांचा समतोल साधत कुठेही हे चेहरे मराठेशाहीच्या इतिहासापेक्षा मोठे ठरणार नाहीत, इतक्या संयत पध्दतीने दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ची मांडणी केली आहे.

दक्षिणेत आपली सत्ता बळकट करण्याच्या दृष्टीने मुघल बादशहाने मिर्झा राजे जयसिंग यांना मराठय़ांच्या विरोधात उभे केले. त्यावेळी मिर्झा राजेंनी पुरंदर किल्ल्याबरोबरच कोंढाणाही ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंबरोबर तह केला जो पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो, ज्यात महाराजांना २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. पुढे आग्र्याहून सुटके नंतर रायगडावर परतलेल्या शिवाजी महाराजांनी हे २३ किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्याची मोहिम सुरू केली. ज्या मोहिमेचा शुभारंभ महाराजांना कोंढाणा ताब्यात घेऊन करायचा होता. आपल्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका महाराजांना देण्यासाठी रायगडावर पोहोचलेल्या तानाजींनी रायबाच्या लग्नाची मोहिम बाजूला ठेवून कोंढाण्याची मोहिम हातात घेतली आणि मग पुढे काय घडले हा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे. ‘तानाजी :  द अनसंग वॉरिअर’ चित्रपटात तानाजी केवळ महाराजांचे शूरवीर सरदार म्हणून आपल्यासमोर येत नाहीत. तर लहानग्या शिवबाबरोबर रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेणारा त्यांचा खास मित्र, स्वराज्यासाठी प्राणांवर उदार होऊन लढणारा त्यांचा मर्द मावळा मित्र, तान्हाजीचे महाराजांच्या मनातील स्थान, खुद्द तान्हाजींचे महाराज आणि जिजाऊंबरोबरचे नाते आपल्याला या चित्रपटात नव्याने उलगडते. तर्कसुसंगत मांडणीचा प्रयत्न, व्हीएफएक्सचा उत्तम वापर आणि कलाकारांचा चोख अभिनय या तिन्हीच्या जोरावर हा चित्रपट आपला प्रभाव टाकतो. इतिहासातील संदर्भ तर्कसुसंगतही असायला हवेत, असा दिग्दर्शक म्हणून ओम राऊत यांचा आग्रह त्यांनी चित्रपटातही जपलेला आहे. त्यामुळे आपण कोंढाणा चढण्यासाठी तान्हाजींनी घोरपडीचा वापर केला हा संदर्भ इतिहासात वाचलेला असतो. इथे दिग्दर्शकाने घोरपडे बंधूंना लोकांसमोर आणले आहे.

चित्रपट करताना दिग्दर्शकाने स्वातंत्र्य घेतलेले असले तरी त्याने तर्कसुसंगत आणि ऐतिहासिक वास्तवाला धक्का बसणार नाही, याची काळजी घेतल्याचे सातत्याने दिसून येते. व्हीएफएक्सचा वापर चित्रपटात खूप मोठय़ा प्रमाणावर आहे मात्र त्याचा अचूक वापर करत कोंढाणा सर करण्यासाठी अंगावर येणारा द्रोणागिरी कडा तान्हाजी आणि त्यांचे मावळे कसे चढून गेले याचे अफलातून चित्रण दिग्दर्शकाने केले आहे. अजय देवगण आणि काजोल दोघांनीही आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. मात्र खऱ्या अर्थाने भाव खाऊन गेला आहे तो उदयभानच्या भूमिकेतील सैफ अली खान. उदयभानचा पराक्रम, त्याचा विक्षिप्तपणा अशा वेगवेगळ्या छटा त्याने उत्तम रंगवल्या आहेत. रुबाबदार आणि जाणत्या राजाच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर शोभून दिसला आहे. शशांक शेंडे, अजिंक्य देव, देवदत्त नागे अशा अनेक लहान-मोठ्या भूमिकांमधून मराठी कलाकारांनी उत्तम काम केले आहे. चित्रपट देशभरातील प्रेक्षकांना आपलासा वाटण्यासाठी तो तितकाच प्रभावी आणि व्यावसायिक निर्मितीमूल्ये असलेला असायला हवा हे भान ठेवूनही तान्हाजी मालूसरेंची शौर्यगाथा अत्यंत सरळ-नेटके पणाने लोकांपर्यत पोहोचवत उत्तम चित्रपटाचा गड ओम राऊत यांनी यशस्वीपणे राखला आहे.

तान्हाजी : द अनसंग वॉरिअर

दिग्दर्शक – ओम राऊत

कलाकार – अजय देवगण, काजोल, देवदत्त नागे, शशांक शेंडे, सैफ अली खान, शरद केळकर, ल्यूक केनी, नेहा शर्मा, अजिंक्य देव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:34 am

Web Title: tanhaji movie review abn 97
Next Stories
1 विदेशी वारे : ‘ऑस्कर’ सूत्रसंचालकाविना..
2 पाहा नेटके : भॉ ऽऽ कथा
3 हिंसाचाराच्या माध्यमातून अभिव्यक्त होणे चुकीचे
Just Now!
X