जेव्हा अभिनेत्री तनुश्री दत्ता नाना पाटेकर यांनी 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या वेळी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप करत होती तेव्हा नाना पाटेकर ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. तनुश्रीने गंभीर आरोप करुनही चित्रपटाच्या सेटवर काहीच फरक पडला नव्हता. चित्रपटाचं शुटिंग नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु होतं. मात्र अभिनेता अक्षय कुमारने भूमिका घेतल्यानंतर गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली. दिग्दर्शक साजिद खानविरोधात तीन महिलांनी लैंगिक गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर अक्षय कुमारने ज्यांच्याविरोधात आरोप आहे त्यांच्यासोबत काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

सलोनी चोप्रा, रेचेल आणि करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानसोबत आलेले धक्कादायक अनुभव शेअर केले होते. साजिद खानवरील गंभीर आरोपांची दखल घेत अक्षय कुमारने पुढील चौकशी होईपर्यंत ‘हाऊसफुल 4’ चं शुटिंग थांबवलं होतं. आरोपांनंतर साजिद खानने चित्रपटातून माघार घेतली असून फरहाद सामजीवर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर नाना पाटेकर यांनीही चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. अनिल कपूर त्यांची जागा घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान तनुश्री दत्ताने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी चित्रपट सोडण्यावर प्रतीक्रिया व्यक्त केली आहे. ‘अजून वाट पाहूयात. मी अद्याप सेलिब्रेशन करत नाहीये, कारण अजून खूप काही करण्याची गरज आहे. मला आनंद आहे की अक्षय कुमारने पुढाकार घेत अशा लोकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला’.

‘आमीर खान, किरण राव आणि इतरही प्रोडक्शन हाऊस भूमिका घेत असल्याचाही मला आनंद आहे. पण हे तात्पुरतं नसावं अशी अपेक्षा आहे. सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सध्या नाही आणि नंतर एकत्र असं होऊ नये. त्यामुळे हे कुठपर्यंत जातंय हे पहावं लागेल, त्यामुळे मी अद्याप सेलिब्रेशन करत नाहीये’, असंही तनुश्रीने म्हटलं आहे. पण अभिनेते भूमिका घेत असल्याचा आनंदही तिने यावेळी व्यक्त केला आहे.

‘अभिनेते भूमिका घेऊन काम करण्यास नकार देत आहेत, हाऊसफुल 4 चा वाद, फँटमसारखे प्रोडक्शन हाऊस बंद होतायत, मामी चित्रपट नाकारत आहे आणि उचलली जात असलेली पाऊलं महिलांना पाठबळ देत आहे. आधी फक्त मी बोलत होते, नंतर लोकांनी मला समर्थन देण्यास सुरुवात केली आणि आता अनेकजण आपले अनुभव शेअर करत आहे. हा राष्ट्रीय मुद्दा झाला आहे. लोकांनी पुढे येऊन आपले अनुभव शेअर करण्यासाठी हे गरजेचं होतं. त्यांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे आणि त्याचा परिणाम होईल याचं आश्वासन दिलं पाहिजे. ही मोहीम पुढे सुरु राहिली पाहिजे. अद्यापही अनेकांनी आपले अनुभव शेअर केले नसून त्यांनीदेखील पुढे आलं पाहिजे’, असं मत तनुश्रीने व्यक्त केलं आहे.

यावेळी तनुश्रीने सिंटाने नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समीर सिद्दीकी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘त्यांनी माझी मस्करी केली माझ्यावर दबाव आणला. त्यामुळे फक्त एका अभिनेत्याला चित्रपटाला सोडायला लागणे माझ्यासाठी पुरेसं नाही. ही बदला घेण्यासाठीची मोहीम नाही. मी माझ्या आयुष्यातील 10 वर्ष वाया घालवली आहेत. काम माझी आवड आहे पण त्यापासून दूर राहावं लागलं’, असं तनुश्रीने म्हटलं आहे.