अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने एका मुलाखतीत केला. यानंतर बुधवारी रात्री तनुश्री दत्ताने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तनुश्रीने तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग आणि हॉर्न ओके चित्रपटाचे निर्माते सामी सिद्धीकी यांचा समावेश आहे. तक्रार नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा परिधान केला होता.

दोन दिवसांपासून तनुश्रीचा जबाब नोंदविण्याबाबत चर्चा सुरू होती. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. बुधवारी रात्री उशीरा तनुश्रीच्या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तनुश्रीने नोंदवलेल्या जबाबानुसार, २००८ मध्ये हॉर्न ओके प्लिज चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान नानासोबत अश्लील दृश्य देण्यास सांगण्यात आले. मात्र चित्रपटाच्या मूळ करारात त्याचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. तिने या सगळ्याला नकार दिल्याने नंतर तिच्या कारवरही गुंडांमार्फत हल्ला करवला गेला, असा तनुश्रीचा दावा आहे. त्यासंदर्भात तिने ‘मी टू’ मोहिमेंतर्गत सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर हा विषय नव्याने चर्चेत आला.