अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले असून पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजी असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांसह बिहार पोलीसदेखील तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान ‘मुंबई पोलिसांवर विश्वास नाही’, असं अभिनेत्री तनुश्री दत्ताने म्हटल्याचं ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
“न्याय निवाडा करण्याचा बाबतीत मुंबई पोलिसांवर अजिबात विश्वास ठेवता येऊ शकत नाही. ते अशा प्रकारची प्रकरणे लवकर मार्गी लावण्यासाठी कायम घाई करतात. अनेक वेळा त्यांना आरोपींची नावं माहित असतात आणि अशा प्रकरणात त्यांना राजकीय नेत्यांचीही साथ असते. त्यामुळे केवळ त्यावेळी प्रकरण चर्चेत असतं म्हणून ते लोकांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलवतात”, असं तनुश्री या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
View this post on Instagram
पुढे ती म्हणते, “सध्या सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. ते निरपराध लोकांना बोलवून त्यांच्या ८-९ तास चौकशी करतात आणि आम्ही कसोशीने प्रयत्न करतोय असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. पोलीस हे बॉलिवूडपेक्षाही वाईट आहे. ते केवळ निरपराध लोकांना त्रास देतात. त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्र परिवाराला बोलावून तासंनतास त्यांची चौकशी करतात. मात्र शेवटी निकाल काहीच लागत नाही. जर न्याय हवा असेल तर पोलिसांकडे जाऊ नका. पोलीस, कायदे हे सारं पोकळ आहे. चित्रपटाच्या सेटवर माझ्यासोबत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ५ महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी झालीच नाही. उलटपक्षी आमचीच अनेकदा चौकशी झाली. पुरावे आणि साक्षीदार सादर करुन देखील आम्हाला न्याय मिळाला नाही. कदाचित सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जे खरे दोषी आहेत तेच पोलिसांना फोन करत असतील. तेच पोलिसांना सांगत असतील की त्याच्या प्रेयसीला या प्रकरणी अडकवा, त्याच्या मित्रांना दोषी धरा त्यामुळे यांची नावं आपोआप या केसमधून वेगळी होती. हे सारं पाहून खरंच फार संताप होतो”.
View this post on Instagram
दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे नैराश्यात येऊन त्याने जीवनाचा अंत केला असं म्हटलं जात आहे. परंतु, अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील खरं कारणं स्पष्ट झालेलं नाही.