काही कलाकार त्यांच्या कामात इतकी समर्पक वृत्ती ठेवतात की बऱ्याचदा त्यांच्या प्रकृतीचीही हेळसांड होते. कधीकधी हे प्रकरण इतक्या गंभीर पातळीला जातं, की त्यावर मग उपाय करण्यातही अडचणी होतात. अभिनेत्री रिटा भादुरी यांच्यासमोर सध्या असाच एक प्रसंग उभा राहिला आहे. ‘निमकी मुखिया’ या कार्यक्रमात इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रिटा भादुरी कलाविश्वातील एक नावाजलेलं प्रस्थ आहे. वयाच्या ६५ व्या वर्षीसुद्धा कामाप्रती असलेली त्यांची ओढ आणि समर्पक वृत्ती पाहता अनेकांनाच त्यांचा हेवा वाटतो. पण, सतत कामात गुंतलेल्या रिटा यांना किडनीचा आजार असून आता तो जास्तच बळावला आहे. ज्यामुळे त्यांना आता नियमित डायलिसीससाठी जावे लागते.

रिटा यांचा प्रकृती नाजूक असल्याने सेटवरही चित्रीकरणातून मोकळा वेळ मिळताच त्या आराम करण्याला प्राधान्य देतात. ‘निमकी मुखिया’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने या कठीण प्रसंगात रिटा यांना साथ दिली आहे. त्यांच्या डायलिसीसच्या वेळापत्रकानुसारच मालिकेच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक ठरवण्यात येत आहे. जेणेकरुन सेटवर गरज नसल्यास त्या आराम करु शकतील.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

आजारपणाने ग्रासलेल्या रिटा यांचा जीवनाप्रती आणि आपल्या कामाप्रती असणारा दृष्टीकोन मात्र तसूभरही बदललेला नाही. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘वाढत्या वयात होणाऱ्या आजारांमुळे आम्ही काम करणं सोडून द्यावं का? काम करणं, काही तरी करण्यात सतत व्यग्र असणं मला फार आवडतं. आपल्या आजारपणाविषयी मी मुळीच विचार करत नाही. मला ते आवडतही नाही. त्यामुळेच मी स्वत:ला काहीतरी कामात गुंतवून ठेवते. सध्याच्या घडीला मालिकेच्या निमित्ताने मिळालेली टीम पाहता मी स्वत:ला खूप नशिबवान समजते. कारण, अशा व्यक्ती नेहमीच तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा देत असतात.’ रिटा यांचे हे वक्तव्य आणि जीवनाविषयीचा दृष्टीकोन पाहता आजाराचं दडपण असूनही त्याकडे फारसं लक्ष न देण्याच्या त्यांच्या धाडसी वृत्तीची अनेकांनी प्रशंसा केली आहे. त्यासोबतच त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची प्रार्थना केली आहे.