ठाकरे या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर संजय राऊत यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे.

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान बुधवारी रात्री दिग्दर्शक अभिजित पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता. दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. सिनेमागृहाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. यानंतर पानसे कुटुंबासह तिथून निघून गेले. या वादाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी केलेले ट्विट हे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरले. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये पानसे यांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी चित्रपटातून काय संदेश दिला हे सांगतानाच पानसे यांना चिमटा काढल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1088318562706571264

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजित पानसे हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून ते सध्या मनसेत सक्रीय होते. अभिजित पानसे हे पूर्वी शिवसेनेत होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे पदही त्यांच्याकडे होते. मात्र, शिवसेना पक्षश्रेष्ठींवर नाराज झाल्याने ते मनसेत गेले. स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या वादानंतर मनसेचे नेतेही पानसे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चित्रपटामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.