‘फिल्म रिस्टोरेशन अ‍ॅण्ड प्रिझर्वेशन’ हे शब्द खुद्द इंडस्ट्रीतील भल्याभल्यांना धडकी भरवतात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मूळ चित्रफितीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कधी तरी आठवण झाल्यावर लक्षात येते की मूळ चित्रपट चांगल्या स्थितीत नाही आणि मग त्याला पुनरुज्जीवित करणे हे अत्यंत खर्चीक असल्याने त्या दृष्टीने प्रयत्नही केले जात नाहीत. हीच बाब दिग्दर्शक शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांना खटकल्याने त्यांनी वर्षभरापूर्वी चित्रपटांचा हा अनमोल खजिना जपण्यासाठी ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘फिल्म प्रिझर्वेशन अ‍ॅण्ड रिस्टोरेशन २०१५’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सेल्युलॉइड मॅन’ या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून चित्रपट जतन करण्याच्या या चळवळीचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांनी २२ फेब्रुवारीपासून ‘फिल्म प्रिझर्वेशन अ‍ॅण्ड रिस्टोरेशन २०१५’ ही आठवडय़ाभराची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. फिल्म रिस्टोरेशन किती महत्त्वाचे आहे याची जाणीव झाल्यानंतर अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, राजकुमार हिरानी आणि सिद्धार्थ रॉय कपूरसारख्या मंडळींनी हे शिक्षण घेणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ केली आहे, असे डुंगरपूर यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. ‘आलमआरा’ हा आपला पहिला बोलपट. मात्र, त्याआधी १७०० मूक पट आपल्याकडे तयार के ले गेले होते. आज त्यातले केवळ ५ ते ६ चित्रपट वाचले आहेत. १९२५ मध्ये फातिमा बेगम नावाच्या पहिल्या महिला दिग्दर्शकाने चित्रपट तयार केले होते. तेही आज शिल्लक नाहीत. अगदी अलीकडचे म्हणजे भन्साळींच्या ‘खामोशी-द म्युझिकल’ या चित्रपटाची रिळेही त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, असा किस्सा ते सांगतात.
मध्यंतरी, ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून खास त्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्याचा विचार आमिर खानच्या मनात होता. त्यालाही मूळ चित्रपट उपलब्ध होऊ शकला नाही. आपले चित्रपट ही आपली संस्कृती आहे. आपण ‘ताजमहल’सारखी वास्तू जपतो, त्याचे संवर्धन करण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो. चित्रपटांचेही तेच आहे. हे चित्रपट नष्ट झाले तर एक संस्कृती लयाला जाईल. त्यामुळे खर्चीक असले तरी त्यांचे जतन व्हायला हवे, असा आग्रही विचार डुंगरपूर यांनी मांडला. त्यासाठी हॉलीवूडच्या मार्टिन स्कॉर्सेस यांच्या ‘द फिल्म फाऊंडेशन’ची मदत त्यांनी घेतली आहे. ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’च्या वतीने एकाच वेळी जुन्या फिल्म्स जतन करण्याचे आणि हे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरू असून केंद्र सरकारनेही ‘फिल्म डिव्हिजन’च्या कार्यालयात या संस्थेला जागा उपलब्ध करून देत सहकार्य केले असल्याची माहिती डुंगरपूर यांनी दिली.