बहुतांश वेळा लहान मुलांना केंद्रभागी ठेवून केलेल्या मोठय़ासाठींच्या चित्रपटांचा प्रमुख हेतू हा निरागसता शोधण्याचा असतो. म्हणजे अनंत अडचणींच्या, संकटांच्या आणि वास्तव जगाच्या क्रूरतेची कल्पना नसलेल्या मनोवस्थेतील उचापतखोरी, उनाडगिरी आणि वयस्वाभाविक गोष्टी त्यात असतात. मग एखाद्या निश्चित बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत प्रवास करत प्रेक्षकांना आपल्या लहानपणाच्या आठवणींशी जोडण्याचे दुवे पेरत भावनिक उन्नयन करण्याचे काम हे निरागस वगैरे प्रकारचे चित्रपट करतात. गेल्या दहा वर्षांतील इराणी चित्रपट आवडणाऱ्यांचा मोठा वर्ग अशा निरागसनाटय़ांमुळे तयार झाला. तिथल्या चिल्ड्रन ऑफ हेवन, टर्टल्स कॅन फ्लाय या बाल्यदर्शनी चित्रपटांनी दाखविलेल्या दाहक-बिहक वास्तवामध्ये प्रेक्षक बऱ्यापैकी रमले. त्यांच्यासाठी बालपणातील वांडपणाचा कळस असलेला ‘द टीट अ‍ॅण्ड द मून’ हा स्पॅनिश सिनेमा, पौगंडोत्कट  करामतींनी भरलेला ‘मलेना’ हा इटालियन चित्रपट आणि खऱ्या बंदुकांचा सैरावैरा खेळ करणाऱ्या लहानग्यांना दाखविणारा ‘सिटी ऑफ गॉड’ न झेपणाऱ्या कलाकृती ठरू शकतात. भावनिक उन्नयनाऐवजी प्रखर सुन्नता देणाऱ्या या कलाकृतींच्या पंगतीत बसवावा असा अ-निरागस बाल्यावस्थेचे दर्शन करून देणारा ‘द फ्लोरिडा प्रोजेक्ट’ हा चित्रपट यंदाच्या ऑस्करस्पर्धेमध्ये (तीनच दिवसांनी जाहीर होणाऱ्या यादीत) सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी घुसळण करण्याची शक्यता अधिक आहे.

जगभरातील थीम पार्क्‍सना प्रेरणा देणाऱ्या आणि बालकांचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या वॉल्ड डिझ्ने यांच्या वॉल्ट डिझ्ने वर्ल्ड रिसॉर्ट या प्रकल्पाच्या अगदी जवळ घडणारा हा चित्रपट या प्रकल्पाचे दुसरे नाव (फ्लोरिडा प्रोजेक्ट) कथेचा विरोधाभास दर्शविण्यासाठी घेतो. फ्लोरिडा प्रोजेक्टमध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत मुलांचे विश्व जवळून चितारले. ही सहा वर्षांची मुले जगात कोणत्याही भागात जन्म घेऊ शकतील अशी. पण त्यांचा जन्म सुदैवाने (किंवा दुर्दैवाने) पर्यटककेंद्री शहराच्या नजीक झाला आहे. ‘दिव्याखाली अंधार’ उक्तीप्रमाणे बालकांसाठी नंदनवन असलेल्या भागात येथील मुलांना मात्र मुर्दाड आयुष्य लाभले आहे. चित्रपट सुरूच होतो, येथील एका जांभळ्या रंगाच्या स्वस्तातील मोटेलपासून. या मोटेलच्या परिसरातच चित्रपटाची सहा वर्षीय नायिका मुनी (ब्रुकलीन प्रीन्स) आपल्या स्कुटी नावाच्या मित्रासोबत त्यांच्याइतक्याच द्वाड मुलाची वाट पाहताना दिसतात. तो आल्यावर ते आपल्या वांडपणाचा अस्सल नमुना सादर करतात. दुसऱ्या एका मोटेलबाहेर असलेल्या गाडीच्या काचेवर त्यांची थुंकण्याची स्पर्धा सुरू होते. गाडीची मालकीण हजर होताच या स्पर्धेत व्यत्यय येतो. ती गाडी मालकीण या मुलांना शोधत मुनीच्या मोटेलमध्ये थेट दारापाशी हजर होते. पुढच्या क्षणातच मुनीची आई हॅली (ब्रिया व्हिनायटिया) मुनीला गाडी साफ करण्याचे आदेश देते. जे आधीच्या कृत्याहूनही या मुलांना अधिक आवडते. या पहिल्या पाच मिनिटांच्या दृश्यांतच या मुलांच्या आगाऊपणाची कल्पना येऊ लागते. पुढे त्यांचे कारनामे त्यांच्यातील हरविलेल्या निरागसपणाचे दर्शन घडवीत राहते.

मुळात हा परिसर आणि स्वस्तातील मोटेलमध्ये दरएक बंद दाराच्या आत समाजाने ओवाळून टाकलेल्या माणसांचा जथ्था भरलेला असल्याने या मुलांच्या बालपणाला सहाव्या वर्षांतच भाषिक आणि व्यवहारज्ञानाचे अस्तर लागलेले आढळते. ती शाळेत जात नाहीत. ती एकल मातृत्व स्वीकारलेल्या बंडखोर तरुणींची पोरे आहेत. आयांना नोकरी आणि सुरक्षितता नाही. मुलांना जगाच्या असुरक्षिततेची झळ बसलेली नाही. मोटेल व्यवस्थापकबॉबी (विल्यम डेफो) याच्या मोटेल देखरेखीतच या मुलांचेही बिनधास्त वावरत सगळ्यांसाठी उपद्रव करण्याचे उद्योग सुरू असतात. यात कधी ते अर्थ न कळणाऱ्या शिवराळ भाषेमध्ये जगाची खिल्ली उडवितात. तर कधी मोटेलची वीजयंत्रणा बंद करून बॉबी आणि इतर मोटेल रहिवाशांना उपद्रव करतात. मोटेल आणि इतर पर्यटकांकडून पैसे उकळण्याच्या क्लृप्त्या लढवितात आणि आईस्क्रीम खायला पैसे नसल्यास बिनदिक्कत भीक मागून आपली तल्लफ भागवितात.

मुनी ही या मुलांची म्होरकीच. तिच्या शरीरावरून तिच्या सहा वर्षे वयाचा अंदाज अचूक येत असला तरी बोलण्यातून ते तितकुसे असल्यावर विश्वास बसत नाही. सेल्फी आणि जंकफूड पिढीची प्रतिनिधी असलेली मुनी आपल्या आईच्या मोटेलमध्ये छुप्यारीत्या चालणाऱ्या शरीर विक्रयाच्या व्यवहारादरम्यान बाथरूममध्ये मोठय़ा आवाजात संगीतस्नान घेते. तिला घरात येणाऱ्या व्यक्तीचे आगमन आणि निर्गमन कळते. या एका छोटय़ाशा दृश्याची परिणामकारकता अंगावर येणारी आहे आहे. ती पडद्यावर लहान मुलीच्या चेहऱ्यावरून अचूक टिपण्यात आली आहे.

चित्रपटाला सरळ गोष्ट नाही. मुनी आणि तिच्या आईच्या आयुष्यातील वास्तव रूपातील नाटय़च इतके भीषण आहे, की या चुणूकदार मुलीच्या भाळी लिहिल्या गेलेल्या भविष्याच्या जाणिवेची अस्वस्थता पोखरून काढणारी आहे. निरागसतेला लांब राखणाऱ्या यातल्या व्यक्तिरेखांना सहानुभूती किंवा कणव निर्माण करायची नाही, इतके सारेच कणखर आहेत. कोळपलेल्या बाल्याची गिमीकी उदाहरणे मांडणाऱ्या लोकप्रिय इराणी सिनेमा किंवा वॉल्ट डिझ्नेच्या बालककेंद्री सिनेमांच्या अजीर्णावर हा चित्रपट चांगला उतारा ठरू शकतो. ऑस्करच्या सवरेत्कृष्ट सिनेमांच्या गटात तो दाखल होवो किंवा न होवो, त्याची गुणवत्ता कुणीही नाकारू शकत नाही, हे खरे.