सध्या अभिनेते मुकेश खन्ना हे चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी कपिल शर्मा शोवर टीका करत शोमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यावर कपिल शर्माने देखील उत्तर देत ‘तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद शोधायचा आहे आणि कोणत्या गोष्टीतून उणिवा शोधून काढायच्या आहेत हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे’ असे म्हटले होते. त्यावर आता मुकेश खन्ना यांनी देखील उत्तर दिले आहे.
नुकताच मुकेश खन्ना यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कपिलला पुन्हा सुनावले आहे. ‘लोकांना हसवणे हा मुद्दा नव्हता. पण ज्या पद्धतीने लोकांना हसवले जात होते हा माझा मुद्दा होता. मी कधी म्हटलं का की लोकांना हसू नको? लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यापेक्षा जगात कोणतीही चांगली गोष्ट नाही’ असे मुकेश खन्ना म्हणाले.
पुढे त्यांनी म्हटले की, ‘लोकांना हसवणे ही देखील एक कला असते. पण कपिल शर्मा शोमध्ये केवळ अश्लिलता पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा शोमध्ये हे सुरु आहे आणि हे थांबवले पाहिजे असे मला वाटते.’
काय होतं मुकेश खन्ना यांचं ट्विट?
द कपिल शर्मा शो हा जरी संपूर्ण देशात लोकप्रिय असला तरी मला यापेक्षा वाईट कोणताही शो वाटत नाही. या शोमध्ये दुहेरी अर्थांचे विनोद असतात, पुरुषांना महिलांचे कपडे परिधान करायला देतात आणि लोक पोट धरुन हसतात, अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी टीका केली होती.
काय म्हणाला होता कपिल शर्मा?
“सध्याच्या करोनाच्या काळात मी आणि माझी टीम लोकांना हसवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. संपूर्ण जग इतक्या अवघड काळातून जात असताना लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद शोधायचा आहे आणि कोणत्या गोष्टीतून उणिवा शोधून काढायच्या आहेत हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढेही तेच करेन” असे म्हटले होते.