सोनी वाहिनीच्या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडी होत आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त ‘पहरेदार पिया की’ मालिका बंद केल्यानंतर आता ‘द कपिल शर्मा शो’ला सुद्धा काही दिवसांसाठी ब्रेक देण्याचा निर्णय वाहिनीने घेतलाय. कपिलची तब्येत बरी नसल्याने काही सेलिब्रिटी त्याच्या सेटवरुन परतल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. कपिलच्या शोचा एकही नवीन एपिसोड प्रसारित करण्यासाठी तयार नसल्याने वाहिनीला याचा फटका बसतोय. जुने एपिसोड प्रसारित करुन प्रेक्षकांना निराश करु नये यासाठी काही बदल करण्यात येणार आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सुपर डान्सर’ हा रिअॅलिटी शो ‘द ड्रामा कंपनी’च्या वेळेत म्हणजेच रात्री ८ वाजता प्रसारित होईल. तर ‘द ड्रामा कंपनी’ कपिलच्या शोच्या वेळेत म्हणजेच रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येईल. त्यामुळे कपिलला तात्पुरता आराम देण्याचा विचार वाहिनीने केलाय असं म्हणायला हरकत नाही.

याआधी कपिलची तब्येत बरी नसल्याने शाहरुख- अनुष्का, अक्षय- भूमी, अर्जुन कपूर- अनिल कपूर या सेलिब्रिटींना एपिसोड शूट न करताच परतावे लागले होते. तर गेल्याच आठवड्यात ‘बादशाहो’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलेल्या अजय देवगण, इशा गुप्ता आणि इलियाना डिक्रूझ शूट करु न शकल्याने परतले. कपिल झोपल्यामुळे शूटसाठी दोन तास थांबावं लागणार असं त्यांना सांगण्यात आलेलं. पुढचे कार्यक्रम ठरलेले असल्याने अजय आणि त्याच्या टीमने तेथून निघणंच पसंत केलं.

PHOTO : बॉलिवूड पदार्पणासाठी सुहाना घेतेय प्रशिक्षण?

यासंदर्भात वाहिनीचे बिझनेस हेड दानिश खान यांच्याशी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘कपिलसारख्या कलाकारावर आम्हाला अभिमान आहे. ‘द कपिल शर्मा शो’ हा एक यशस्वी कार्यक्रम आहे. जेव्हा एखादा व्यक्ती सलग दीड वर्ष शूट करत असतो, तेव्हा त्यात चढउतार येणं साहजिक आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. पण त्याने वाहिनीला एक चांगला शो दिला. या शोने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.’